आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना नावाच्या जुन्या मित्राला पराभूत करण्यासाठी भाजपाने उत्तर भारतीय मतांची जुळवा-जुळव करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील सभेपासून भाजपा आपल्या मिशन उत्तर भारतीयला सुरुवात करणार आहे. त्यानंतर मुंबईत भाजपातर्फे उत्तर भारतीय मतदार असलेल्या भागांमध्ये छोट्या-छोट्या चौक सभा आयोजित केल्या जाणार आहेत. राज्यात शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर लढली जाणारी ही पहिलीच महानगर पालिका निडणूक आहे. भूमिपुत्र आणि मराठी माणूस हा शिवसेनेचा प्रमुख अजेंडा असल्यामुळे भाजपाला त्यांची नैसर्गिक व्होटबॅंक तपासून बघताना अजूनही चाचपडावे लागत आहे.
दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या सुमारे ४० लाख इतकी आहे. उत्तर भारतीयांची हीच संख्या निवडणुकांच्या वेळी निर्णायक भूमिका बजावत असते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील प्रत्येक क्षेत्रात उत्तर भारतीय कार्यरत आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या जुन्या वॉर्डरचनेनुसार असलेल्या २२७ मतदार संघांपैकी ५० वॉर्ड्समध्ये उत्तर भारतीयांचेच वर्चस्व आहे, तर इतर ४५ ते ५० प्रभागांमध्ये त्यांची संख्या दखलपात्र इतकी आहे. मतांंच्या राजकारणात या मतदारांनी नेहमी राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या कॉंग्रेस आणि भाजपाला साथ दिली आहे. यावेळी कॉंग्रसने उत्तर भारतीय मतदारांचा पक्षावर असलेला विश्वास गमावला असल्यामुळे ४० हजार कोटी रूपयांचे बजेट असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भाजपा पुढे सरसावली आहे.
यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी सांगितलं की उत्तर भारतीय लोकांचा भाजपाकडे कल वाढतोय. कारण त्यांना विश्वास आहे की भाजपा हाच एकमेव पक्ष आहे जो जात आणि धर्म या पलीकडे जाऊन लोकहिताची कामे करतो. भाजपाने नुकतीच त्यांच्या उत्तर भारतीय मोर्चाचे प्रभारी म्हणून कृापाशंकर सिंह यांची निवड केली आहे. कृपाशंकर सिंह हे २०१९ साली कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देउन भाजपावासी झाले. कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबाची मुळं ही उत्तर प्रदेशातच आहेत. मुंबई आणि उपनरांतील उत्तर भारतीयांमध्ये कृपाशकर सिंह यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा फायदा भाजपाला होइल अशी त्यांची अपेक्षा आहे. मी एक पक्षाचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष जे काम माझ्यावर सोपवेल ते मी पूर्ण करणार असा निर्धार कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला आहे.
पांडे यांनी दावा केला आहे की, “२०१४ ते २०१९ या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या काळात उत्तर भारतीय समाजावर कधीही अन्याय झाला नाही किंवा त्यांना वाईट वागणूक दिली गेली नाही. भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय संघ तेथील लोकांसाठी २४ तास सक्रीय आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या एका हाकेवर लॉकडाउनच्या काळात शेकडो कार्यकर्ते मुंबईकरांना मदत करत होते”. त्याचवेळी राज्य सरकारवर टीका करताना पांडे म्हणतात की. “लॉकडाउनच्या काळात मुंबईतील उत्तर भारतीय लोकांना अन्न आणि निवाऱ्यासारख्या मुलभूत गोष्टी पुरवण्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कमी पडले. त्यामुळेच २० ते २२ लाख उत्तर भारतीयांना मुंंबई सोडावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता आणि उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा आणलेली सत्ता, या मुळे लोक भाजपाकडे वळतील अशी अपेक्षा आहे”.
आता देवेंद्र फडणवीस मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांची तयारी मुंबईतील सभेपासून सुरू करत आहेत. तर २०१७ च्या महानगर पालिका निवडणुकांनंतर शिवसेनेने आगामी राजकारणाची पावले ओळखून उत्तर भारतीयांमध्ये आपली प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सतत या समाजाच्या लोकांच्या संपर्कात आहेत. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा याच अजेंड्याचा भाग आहे असे म्हणता येईल.