मुंबई : मुंबई आणि परिसरात रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा मोठा फटका सोमवारी विधिमंडळाला बसला. पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाल्याने तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्याने अनेक मंत्री, आमदार, अधिकारी- कर्मचारी विधिमंडळात पोहोचू शकले नाहीत. त्यातच हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या उभय सभागृहांचे कामकाज सोमवारी स्थगित करण्यात आले.
विधिमंडळाला गेले दोन दिवस सु्ट्टी असल्यामुळे मंत्री, आमदार आपापल्या मतदारसंघात गेले होते. रविवारी रात्री मंत्री आणि आमदार रेल्वेगाडीने मुंबईच्या दिशेने निघाले. परंतु मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडून पडली होती. मुलुंड- नाहूर आणि शिव परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने उपनगरीय सेवा काही काळ ठप्प झाली होती. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ठिकठिकाणी अडकून पडल्याने अनेक मंत्री आणि आमदार रेल्वेगाड्यांमध्ये अडकून पडले होते. मुंबईतील रेल्वे आणि वाहतूक ठप्प झाल्याने विधिमंडळातील कर्मचारीही पोहचू शकले नाहीत.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती सभागृहास देताना सदस्य आणि अधिकारी- कर्मचारी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. यावेळी मंत्री तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे मिळून जेमतेम १७ सदस्य उपस्थित होते. दुपारी पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच दिवसभरासाठी विधानभा तहकूब करण्याची घोषणा अध्यक्षांनी केली.
हेही वाचा >>> मुरबाडमध्ये कथोरेंची महायुतीतच कोंडी?
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पर्जन्यस्थितीची माहिती दिली. रात्रीपासून कोकण आणि मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्याच्या अन्य भागांतही पाऊस आहे. गेल्या २४ तासांत कुलाबा येथे ८३ तर सांताक्रुझ म्हणजेच उपनगरात २६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे मुंबई उपनगरात काही ठिकाणी पाणी साचले असून त्याचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. तसेच रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. हवामान विभागाने पुढील काही तासांत मुंबईसह रायगड, रत्नगिरी जिह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचता यावे यासाठी कामकाज तहकूब करण्याची विनंती त्यांनी अध्यक्षांना केली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पावसामुळे आजचे कामकाज वाया गेले असून सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी एक दिवस वाढविण्याची मागणी केली. मुंबईत सुमारे १२० मिलिमीटर पाऊस पडला असताना सर्वत्र पाणी साचले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे घरी जाता यावे याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. विधान परिषदेचे कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढा शेलार
यंदा योग्यपणे नालेसफाईच झालेली नाही. त्यामुळे शहरात पाणी तुंबले असल्याचे सांगत भाजचे आशीष शेलार यांनी मुंबईतील नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. ज्यावेळी सर्व लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात व्यग्र होते, त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे मोठे नाले, छोटी गटारे यांची सफाई कंत्राटदारांनी योग्यप्रकारे केली नाही,नाल्यातील गाळ पूर्ण निघाला नाही. काढलेला गाळ उचलला गेला नाही, आम्ही ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतरही कामे झाली नसल्याचा आरोप करीत महापालिकेच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.
मंत्री रुळांवरून चालत विधान भवनात
बाहेरगावाहून येणाऱ्या गाड्या सकाळच्या वेळी मुंबईत अडकून पडल्या. मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील हे बराच वेळ वाट बघून काही आमदारांसह रुळांवरून चालत निघाले. वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकले होते. शेवटी त्यांनी कल्याणहून रस्तेमार्गाने प्रवास सुरू केला, पण वाहतूक कोंडीचा त्यांना फटका बसला.
© The Indian Express (P) Ltd