पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपपुढे उमेदवार ब्राह्मण असावा की ब्राह्मणेतर असा तिढा निर्माण झाला आहे. ब्राह्मणेतर उमेदवार दिल्यास ‘कसब्या’ची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे, तर ब्राह्मणेतर उमेदवार देऊन पुन्हा पुण्यात नवीन प्रयोग करून पाहायचा, अशा कोड्यात भाजप पडली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता भाजपने सर्वेक्षणाचा मार्ग अवलंबला आहे.
एका खाजगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतरच उमेदवार अंतिम करण्याची वेळ भाजपवर आली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यातील भाजपकडे एकखंबी नेतृत्त्व राहिलेले नाही. शिवाय भावी खासदार हा पुण्याचा नवा कारभारी होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून उमेदवार निवडताना सर्वेक्षणातून सर्व पातळ्यांवर चाचपणी केली जाणार आहे.
बापट यांच्या निधनामुळे पुण्यातून भाजपला नवीन उमेदवार शोधावा लागत आहे. त्यामध्ये भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, वडगाव शेरीचे माजी आमदार, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी महापौर तसेच भाजपचे विद्यमान प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची नावे अग्रस्थानावर आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच ब्राह्मणेतर उमेदवार देऊन नवीन बदल करण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र, त्यांच्यावर पराभवाची वेळ आली. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत या अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भाजपकडून खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, ब्राह्मण उमेदवार द्यायचा की ब्राह्मणेतर, असा प्रश्न भाजपपुढे उभा राहिला आहे. ब्राह्मण उमेदवार दिल्यास पुणेकर स्वीकारणार का; तसेच मराठा किंवा ओबीसी उमेदवार देऊन नवीन प्रयोग करायचा, अशा कोड्यात भाजप पडली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सर्वेक्षणाचा आधार घेण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
एका खासगी संस्थेकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामध्ये तीन उमेदवारांपैकी कोणाला पुणेकर पसंती देतात, याचा अंदाज घेतला जाणार आहे. या तिन्ही उमेदवारांच्या जमेच्या बाजूबरोबरच कमकुवत बाजू आहेत. त्याचा विचार करून प्रश्नावली निश्चित केली जाणार आहे. त्या प्रश्नावलीच्या आधारे सर्वेक्षण करून हाती येणारा निष्कर्ष पाहिल्यानंतरच उमेदवार निश्चित होणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
उमेदवारांच्या जमेच्या, कमकूवत बाजू
सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रसारक आहेत. भाजप संघाला मानणारा मोठा वर्ग पुण्यामध्ये आहे ही त्यांची जमेची बाजू आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देवधर यांच्याकडे होती. तसेच २०१८ मध्ये त्रिपुरा येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर त्यांचा संपर्क आहे. मात्र, पुण्याच्या सक्रिय राजकारणात ते कधीही नव्हते.
माजी आमदार जगदीश मुळे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले असून भाजपच्या शहराध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी शहरभर लोकसंपर्क ठेवला होता, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांचा राज्यातील नेत्यांशी संपर्क आहे. मात्र, पक्षाअंतर्गत त्यांना विरोधक आहेत. विरोधकांना शांत करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुरघोड्याच अधिक !
माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी करोनाच्या काळामध्ये केलेले काम पुणेकरांना ठाऊक आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पाठिंबा आहे. सध्या ते प्रदेश सरचिटणीस असल्याने राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्याही संपर्कात असतात ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, त्यांच्या नावालाही पक्षाअंतर्गत विरोध होऊ लागला आहे. यापूर्वी ते नगरसेवक होते. त्यांना एकदम खासदारकीची संधी द्यायची का? असा सवाल पक्षाअंतर्गत विचाराला जाऊ लागला आहे.
अनुभवी देवधर यांना संधी मिळणार की, मुळीक आणि मोहोळ या तरुण उमेदवारांचे नशीब उजळणार, हे सर्वेक्षणातून स्पष्ट होणार आहे. पुण्याचा भावी खासदार कोण, याचा अंदाज या सर्वेक्षणाद्वारे पुणेकर दाखवून देणार आहेत.