या वर्षाच्या शेवटी तेलंगणा राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती (बीएरएस) पक्षाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे बीआरएस पक्षाचे नेतेदेखील सत्ता कायम राखण्यासाठी आतापासूनच कामाला लागले आहेत. येथे अद्याप निवडणुकीची घोषणा झालेली नाही. असे असले तरी बीआरएस पक्षाने येथे आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण ११५ जागांसाठी उमेदवारांची नावे देण्यात आलेली आहेत.
तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे विधानसभेच्या गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवर निवडणूक लढवतील. तशी माहिती बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे.
“आम्ही ९५ ते १०५ जागांवर विजयी होणार”
तेलंगणाच्या एकूण ११९ जागांपैकी बीआरएस पक्षाने एकूण ११५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना केसीआर यांनी आमचा पक्ष एकूण ९५ ते १०५ जागांवर विजयी होईल, अशा विश्वास व्यक्त केला. ही यादी जाहीर करताना केसीआर यांनी आमची एमआयएम पक्षासोबतची मैत्री कायम राहणार आहे, असेही विधान केले. मात्र या दोन पक्षांत जागावाटप होणार की नाही, याबाबत मात्र अद्याप अस्पष्टता आहे.
चार जागांवर उमेदवारांची घोषणा नाही
बीआर पक्षाने आपल्या पहिल्या यादीतील एकूण सात मतदारसंघासाठी उमेदवार बदलला आहे. बोथ, खानपूर, वायरा, कोरटुला, उप्पल, असीफाबाद, मेटापल्ली या मतदारसंघांचा यात समावेश आहे. तर कोशामहल, नामपल्ली, जनगाव आणि नरसापूर या जार जागांसाठी बीआरएस पक्षाने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही.
“यातून जनतेचा केसीआर यांच्यावरील विश्वास प्रतिबिंबित होतो”
दरम्यान, बीआरएस पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच केसीआर यांची कन्य तथा विधानपरिषदेच्या आमदार के. कविता यांनी प्रतिक्रिया दिली. या यादीतून तेलंगणातील लोकांचा विश्वास प्रतिबिंबित होत आहे, अशा भावना कविता यांनी व्यक्त केल्या. “आपले नेते केसीआर यांनी ११५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीतून लोकांचा केसीआर यांच्यावर असलेला विश्वास प्रतित होतो. आम्ही तेलंगणातील जनतेचे आशीर्वाद मागत आहोत,” अशी प्रतिक्रिया के. कविता यांनी दिली.
२०१८ सालच्या निवडणुकीत काय स्थिती?
२०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाला एकूण ८८ जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेस आणि एमआयएम पक्षाला अनुक्रमे १९ आणि ७ जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपाचा फक्त एका जागेवर विजय झाला होता.