दिल्लीमधील कथित मद्य घोटाळ्यात नाव आल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या तथा आमदार के कविता चांगल्याच चर्चेत आहेत. के कविता येत्या शनिवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. असे असतानाच त्यांनी मोदी सरकार तथा भाजपावर सडकून टीका केली आहे. त्यांनी विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे एकत्र येण्याचे आवाहन करताना त्यांनी काँगेसलाही आरसा दाखवला आहे. काँग्रेसने त्यांच्याकडे देशभरात किती आमदार आहेत, याचा विचार करावा तसेच देशाप्रति असलेले उत्तरदायित्व ओळखावे, असे कविता म्हणाल्या आहेत.
हेही वाचा >> निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात भाजपला खिंडार? दोन बडे नेते काँग्रेसच्या वाटेवर
काँग्रेसने टीम प्लेअर होण्याची गरज
भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्ष भाजपाची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जातो. यावर कविता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जो पक्ष भाजपाविरोधी आवाज उठवतो, त्याला नेहमीच भाजपाची बी आणि सी टीम म्हटले जाते. काँग्रेसने टीम प्लेअर होण्याची होण्याची गरज आहे. २०२४च्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने एका टीम प्लेअरप्रमाणे वागले पाहिजे,” असे के कविता म्हणाल्या.
हेही वाचा >> पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान, ८० दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस नेता म्हणाला, “मला मोठा धडा मिळाला…”
तुमच्याकडे देशभरात फक्त ६०० आमदार
त्यांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. “देशातील सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आम्हाला वाटते. काँग्रेसने त्यांची देशाप्रति असलेली जबाबदारी ओळखायला हवी. अजूनही काँग्रेसला आमच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांनी तथ्य तपासायला हवे. देशातील ४००० आमदारांपैकी काँग्रेसचे फक्त ६०० आमदार आहेत. काँग्रेसकडे तामिळनाडूमध्ये अवघे १७ आमदार आहेत. तामिळनाडू, बिहारमध्ये ते आघाडी करून सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या मेहनतीने त्यांचा फक्त एकच आमदार निवडून आला आहे. मला विरोधी पक्षावर टीका करायची नाही. विरोधकांनी एकत्र यावे, असे माझे मत आहे,” असेही के कविता म्हणाल्या.
हेही वाचा >> दिल्ली मद्य घोटाळ्यातील आरोपानंतर के कविता आक्रमक; म्हणाल्या, “घाबरणार नाही, मुख्य टार्गेट…”
काँग्रेस अहंकार कधी बाजूला ठेवणार?
आमच्याकडून प्रयत्न केला जात आहे. मात्र काँग्रेसकडून प्रयत्न झाले पाहिजेत. काँग्रेस त्यांच्यातील अहंकार कधी बाजूला ठेवेल आणि वास्तवाकडे कधी पाहील हा प्रश्न आहे, असे कविता म्हणाल्या.