नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करीत असून त्यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षही मैदानात उतरला आहे. या पक्षाने दीडशे जागा लढण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट न होता अनेक जागांवर बहुरंगी लढत बघावयास मिळण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आधीच कंबर कसली आहे. तसेच बहुजन समाज पक्ष, संभाजी राजे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांची मनसे रिंगणात आहे. एमआयएमदेखील निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. आता बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने तयारी सुरू आहे.

हेही वाचा – संजय राठोड यांना शह देण्यासाठी भाजपची खेळी? पोहरादेवीतील नाराजी दूर करण्यासाठी धर्मगुरूंना आमदारपद!

हेही वाचा – लोकसभेतील पराभूत डॉ. हिना गावित यांची अक्कलकुवा मतदारसंघात तयारी

बीआरएसपीचे नेते ॲड. सुरेश माने यांनी राज्यातील विधानसभा निवडणुका लढण्याची तयार दर्शवली. राज्यात सुमारे दीडशे जागांवर उमेदवार उभे करण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. कांशीराम यांचा १८ वा स्मृतिदिन व बीआरएसपीचा ९ वा स्थापना दिवस नागपुरात आयोजित करण्यात आला. यात पक्षाचे प्रमुख ॲड. माने यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, काही नेते आंबेडकरी नेत्यांच्या ऐक्याचे प्रयत्न करीत आहेत. बीआरएसपीने त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला. प्रत्येक बैठकीत उपस्थित राहिलो. पण, दलित आमदार, खासदार स्वबळावर निवडून येऊ नये, अशी भाजप आणि काँग्रेसची मानसिकता आहे, तशीच भूमिका काही दलित नेत्यांचीही आहे. यामुळे समाजाच्या ज्वलंत समस्या घेऊन सातत्याने संघर्ष करणाऱ्या बीआरएसपीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ कांशीराम यांनी स्वाभिमान, ध्येय बाळगून गतिमान केली. त्यांचाच वारसा आमचा पक्ष पुढे चालवत आहे. आमचा पक्ष विधानसभेच्या दीडशे जागा लढवण्याची तयारी करीत आहे, असे माने यांनी संविधान चौकातील कार्यक्रमात सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brsp in the assembly election field in maharashtra ready to enter election with 150 seats print politics news ssb