देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांची २३ जून रोजी पटणा येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र येण्यास सहमती दर्शवली. या बैठकीला देशातील जवळजवळ १५ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र बहुजन समाज पक्षाचा कोणताही प्रतिनिधी या बैठकीत हजर नव्हता. मागील अनेक दिवसांपासून बसपाच्या सर्वेसर्वा मायावती ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत असल्यामुळे त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले नव्हते. दरम्यान, या बैठकीनंतर बसपाने काँग्रेसविरोधात नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे म्हटले जात आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसपा पक्ष विरोधकांशी आघाडी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दलित, ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा बसपाचा प्रयत्न
बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाच्या सर्वेसर्वा मायावती विरोधकांच्या बैठकीला उपस्थित नव्हत्या. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशमधील दलित, ओबीसी आणि पशमांदा मुस्लीम समाज याआधी बसपा पक्षाचा मतदार होता. मात्र मागील काही वर्षांपासून हा मतदार आता भाजपाकडे आकर्षित झाल्याचे पाहायला मिळते. २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावती तसेच त्यांच्या पक्षाने हा मतदार पुन्हा एकदा स्वत:कडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मायावती विरोधकांच्या बैठकीत उपस्थित नव्हत्या. मात्र मागील काही दिवसांपासून त्या भाजपाविरोधात टीका करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बसपा पक्षाने वेगवेगळ्या समुदायातून येणाऱ्या नेत्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांत नियुक्ती केली आहे. मागील काही वर्षांत जे मतदार दुसऱ्या पक्षांकडे वळालेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा बसपाकडे परत आणण्याची जबाबदारी या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. २०१२ सालापासून बसपाच्या मदारांमध्ये सातत्याने घट झालेली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसपा पक्ष युती करणार?
याआधी मायावती यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केलेली आहे. अनेकवेळा त्यांनी याचा उल्लेखही केलेला आहे. असे असले तरी सध्या बसपा पक्ष विरोधकांची संभाव्य आघाडी आणि या आघाडीसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांकडे लक्ष ठेवून आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसपा पक्ष विरोधकांच्या आघाडीमध्ये सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपावर सडकून टीका, काँग्रेसचा उल्लेख टाळला
मिळालेल्या माहितीनुसार २३ जून रोजी झालेल्या विरोधकांच्या बैठकीपूर्वी बसपाची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत मायावती यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना काँग्रेसवर टीका करताना कठोर शब्दांचा वापर टाळावा. तसेच काँग्रेसविरोधात नरमाईचे धोरण स्वीकारावे, असे अनौपचारिकरित्या आहे. काही दिवसांपूर्वी मायावती यांनी भाजपा आणि समाजवादी पक्षावर सडकून टीका केली होती. मात्र यावेळी त्यांनी काँग्रेसचा उल्लेख केला नव्हता. यावरून बसपा पक्ष विरोधकांशी आघाडी करण्याचा आपला पर्याय खुला ठेवत असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेसवर कठोर टीका न करण्याच्या सूचना
या भूमिकेवर बसपा पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अयोग्य शब्दांचा वापर करून काँग्रेसवर टीका करणे टाळावे, असे बसपाच्या नेत्यांना अनौपचारिकरित्या सांगण्यात आलेले आहे. मला वाटते पक्षाने भविष्यात युती करण्यासाठी आपला पर्याय खुला ठेवला आहे,” अशी प्रतिक्रिया बसपाच्या एका नेत्याने दिली.
“आम्ही मायावतींच्या सूचनांचे पालन करू”
“भाजपा पक्ष काँग्रेसविरोधात मवाळ धोरण स्वीकारत आहे, असे मला वाटतेय. मला वाटते की २०२४ साली काँग्रेस पक्ष युतीसाठी योग्य आहे,” असे बसपाच्या एका खासदाराने म्हटले आहे. तसचे बसपाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी मात्र यावर भाष्य करणे टाळले आहे. “अन्य पक्षांशी युतीसंदर्भात मायावती यांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे मी यावर भाष्य करू शकत नाही. मायावती ज्या सूचना देतील, त्याचे आम्ही पालन करू,” असे विश्वनाथ पाल म्हणाले.
मायावतींचा याआधी ‘एकला चलो रे’ चा नारा
मायावती यांनी याआधी १५ जानेवारी २०२३ रोजी विरोधकांच्या आघाडीवर भाष्य केले होते. बसपा पक्षाची विचारधारा अन्य विरोधी पक्षांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे आम्ही आगामी निवडणुका कोणाशीही युती न करताच लढू. आम्ही युती करणार आहोत, अशा अफवा काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांनीच पसरवल्या आहेत, असे तेव्हा मायावती म्हणाल्या होत्या.
बसपाकडून राबवले जातेय ‘गाँव चलो अभियान’
दरम्यान, जनसंपर्क वाढवण्यासाठी बसपा पक्षाकडून सध्या ‘गाँव चलो अभियान’ राबवले जात आहे. ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी बसपा पक्ष पहिल्यांदाच अशा प्रकारची मोहीम राबवत असल्याचे म्हटले जात आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक बुथवर पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडे मतदारांशी संपर्क साधण्याचे तसेच बसपा पक्षाची विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक ८ ते १० बुथसाठी पक्षाने सेक्टर कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीमध्ये एकूण ७० सदस्य आहेत.