बहुजन समाज पार्टी (बसपा) हा राष्ट्रीय पक्ष आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षाने जवळपास संपूर्ण देशभरात उमेदवार उभे केले होते. एकेकाळी उत्तर प्रदेश राज्यामध्ये सत्तेत असणारा आणि राष्ट्रीय राजकारणातील उदयोन्मुख पक्ष म्हणून पाहिला गेलेला हा पक्ष आता आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. तसेच संपूर्ण देशभरात या पक्षाचा मतटक्का २.०४ टक्क्यांवर घसरला आहे. बसपा हा दलितांचे प्रतिनिधित्व करणारा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र, निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा आपला आढावा घेतला. त्यानुसार बसपाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाऊ शकतो, असे वृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. एप्रिल १९८४ साली कांशीराम यांनी या पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्यानंतर मायावती यांनी हा पक्ष आपल्या ताब्यात घेतला. १९९७ साली बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला होता. पक्षाच्या स्थापनेपासूनच बसपाचा जनाधार आणि मतटक्का वाढता होता. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर दलितांचा हक्काचा राजकीय पक्ष म्हणून या पक्षाकडे पाहिले जात होते. मात्र, उत्तर प्रदेशमधील २०१२ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या पक्षाला उतरती कळा लागली. सध्या देशामध्ये सहा पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा आहे. त्यामध्ये भाजपा, बसपा, काँग्रेस, आप, राष्ट्रीय पीपल्स पार्टी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या पक्षांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा