Mayawati’s BSP Candidates for Loksabha भाजपाच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकजूट होत असताना बहुजन समाजवादी पक्षा (बसपा)च्या सर्वेसर्वा मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. नुकतंच बहुजन समाज पक्षाने (बसप) पश्चिम उत्तर प्रदेशमधील सहारनपूर, अमरोहा आणि मुरादाबाद या तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे तिन्ही उमेदवार मुस्लीम समुदायाचे आहेत. यामुळे इंडिया आघाडीतील समाजवादी पक्ष-काँग्रेस अडचणीत आला आहे. मायावतींच्या नेतृत्वाखालील बसपने तिन्ही मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने सपा-काँग्रेस युतीला मिळणारी अल्पसंख्याक मते कमी होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बसपचे तीन उमेदवार कोण आहेत?

गेल्या आठवड्यात सहारनपूर, अमरोहा आणि मुरादाबाद या मतदारसंघात पक्षीय कार्यक्रमांमध्ये, बसपने इरफान सैफी यांना मुरादाबादमधून, मुजाहिद हुसेन यांना अमरोहामधून आणि माजिद अली यान सहारनपूरमधून उमेदवारी जाहीर केली.

मुरादाबाद मतदारसंघ

इरफान सैफी हे ओबीसी मुस्लीम असून, ते सध्या मुरादाबाद जिल्ह्यातील ठाकूरद्वारा नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये बसपने मुरादाबादमधून निवडणूक लढवली नव्हती, कारण ही जागा त्यांच्या आघाडीत सपाकडे गेली होती. या जागेवर सपाचे एस.टी. हसन यांनी ९७,८७८ मतांनी मोठा विजय मिळवला होता. यंदा सपा आणि काँग्रेसची युती आहे. मागील निवडणुकीचा परिणाम पाहता यंदाही सपाने मुरादाबाद ही जागा स्वतः जवळ राखून ठेवली आहे. सपाने अद्याप या जागेसाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.

अमरोहा मतदारसंघ

अमरोहा येथून बसपने मुजाहिद हुसेन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. हुसेन व्यापारी आहेत. हुसेन यांच्या पत्नी बागे जहाँ या गाझियाबाद जिल्ह्यातील डासना नगर पंचायतीच्या अध्यक्षा आहेत. अमरोहा ही जागा सपाने काँग्रेसला दिली असून, अद्याप काँग्रेसनेही जागेसाठी उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

२०१९ मध्ये बसपने ६३,२४८ मतांनी ही जागा जिंकली होती. परंतु, २०२३ मध्ये पक्षीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बसप खासदार दानिश अली यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. अलीकडेच दानिश अली यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग सहभागी झाल्याने काँग्रेसकडून त्यांना या जागेवरून उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सहारनपूर मतदारसंघ

सहारनपूरमध्ये बसपने माजिद अली यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अली हे ओबीसी मुस्लीम असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.२०१९ मध्ये सहारनपूरमधून बसप खासदार हाजी फजलुर रहमान निवडून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रहमान यांनी २२,४१७ मतांनी ही जागा जिंकली होती.

तुल्यबळ उमेदवारांमुळे लढत रंगतदार ठरणार

या तिन्ही जागांवर मुस्लीम आणि दलित लोकसंख्या जास्त आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही तिन्ही जागांवर मुस्लीम उमेदवार उतरवल्याने सपा-बसप युतीला याचा फायदा झाला होता. यंदा सपा-काँग्रेस युतीला आशा होती की, मुस्लीम समुदायाचा पूर्ण पाठिंबा त्यांना मिळेल. परंतु, बसपच्या तुल्यबळ उमेदवारांमुळे या जागांसाठी होणारी लढत आता रंगतदार ठरणार आहे.

विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने या तिन्ही जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी बसपने एकट्याने निवडणूक लढवली होती. २०१४ साली मुरादाबादमध्ये भाजपाच्या कुंवर सर्वेश कुमार सिंह यांना ४३ टक्के मते मिळाली होती. दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या सपाच्या एस. टी. हसन यांना ३५.२६ टक्के मते मिळाली होती, तर तिसर्‍या क्रमांकावर असणार्‍या बसपच्या हाजी मोहम्मद याकूब यांना १४.२७ टक्के मते मिळाली होती.

अमरोहामध्ये भाजपाचे कुंवर सिंह तंवर यांना ४८.२६ टक्के मते मिळाली होती. सपाच्या हुमेरा अख्तर या ३३.८२ टक्के मते मिळवून दुसऱ्या स्थानावर होत्या, तर बसपाच्या फरहत हसन यांना १४.८७ टक्के मते मिळाली होती. सहारनपूर मतदारसंघात भाजपाचे राघव लखन पाल ३९.५९ टक्के मते मिळवून विजयी झाले होते. काँग्रेसचे इम्रान मसूद यांना ३४.१४ टक्के, तर बसपचे जगदीश सिंह राणा यांना १९.६७ टक्के मते मिळाली होती.

हेही वाचा : पासवान आणि मंडळींना सांभाळताना भाजपाची दमछाक

बसपने अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यापूर्वीच या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. निवडणुकीचे वेळापत्रक आल्यानंतर पक्षाध्यक्ष मायावती जागा आणि उमेदवारांची यादी जाहीर करतील, असे बसपच्या सूत्रांनी सांगितले आहे. बसपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाच्या नियमांनुसार या उमेदवारांना संबंधित लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. निवडणुका जाहीर झाल्या की, तेच या जागांवरील अधिकृत उमेदवार असतील. त्यांना आपआपल्या मतदारसंघात निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे, बसपच्या नेत्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की, तिन्ही उमेदवारांचा त्यांच्या समुदायातील मतदारांशी चांगला संबंध आहे. हे उमेदवार संबंधित जागा जिंकण्यास सक्षम असल्याचे, ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsp muslim loksabha candidates can cut minority votes of sp congress rac