येत्या २३ जून रोजी देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांची बिहामधील पटणा येथे बैठक होणार आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तसेच विरोधकांच्या आघाडीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासून ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र बहुजन समाज पार्टीचा प्रतिनिधी मात्र या बैठकीला हजर राहणार नाही. तशी माहिती संयुक्त जनता दलाच्या नेत्याने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बसपाच्या अध्यक्षा मायावती यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही’

२३ जून रोजी होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला बहुजन समाज पक्षाला निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. तशी माहिती संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी दिली आहे. “बहुजन समाज पक्षाने (बसपा) विरोधकांच्या आघाडीमध्ये सामील होण्याची कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही. याच कारणामुळे बसपाच्या अध्यक्षा मायावती यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. अनेकदा बसपाने काँग्रेसवर भाजपापेक्षा अधिक टीका केलेली आहे,” असे केसी त्यागी म्हणाले.

जे एकत्र येण्यास तयार, त्यांनाच निमंत्रण

ओडिसा राज्यातील बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक तसेच वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते जगनमोहन रेड्डी यांनादेखील बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. यावरही त्यागी यांनी भाष्य केले आहे. “जे पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास तयार आहेत, त्यांनाच निमंत्रण पाठवण्यात आलेले आहे,” असे त्यागी यांनी सांगितले.

‘बसपाशिवाय आघाडीचा प्रयोग अयशस्वी’

२३ जून रोजीची बैठक आणि मायावती यांची या बैठकीला अनुपस्थिती यावर बसपाच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “उत्तर प्रदेशमध्ये बसपाशिवाय विरोधकांची आघाडी उभारण्याचा प्रयत्न केल्यास हा प्रयोग यशस्वी होणार नाही. उत्तर प्रदेशमधील दलित बहुजन समाज पार्टीच्या पाठीशी आहेत,” असा दावा या नेत्याने केला. सध्याजरी बसपा विरोधकांच्या संभाव्य आघाडीपासून दूर असली तरी भविष्यात हा पक्ष विरोधकांसोबत जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर बसपाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ च्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाच आहे. त्या यावर योग्य तो निर्णय घेतील, असे विश्वनाथ पाल यांनी सांगितले.

दरम्यान एकीकडे विरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे बुधवारी (२१ जून) लखनौ येथे बहूजन समाज पार्टीच्या महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीवर विचारविनिमय करण्यात आला.

‘विरोधी पक्षांमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत’

या बैठकीत मायावती यांनी भाजपावर सडकून टीका केली. तसेच विरोधी पक्षांमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत, असे मायावती यांनी सांगितले.

“आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले आहेत. भाजपा आणि केंद्र सरकारच्या कामांमुळे सध्या विरोधी पक्षांमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, त्यावर आम्ही बारिक लक्ष ठेवून आहोत,” असे मायावती यांनी सांगितले. यासह मुख्य मुद्द्यावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजपा सरकारकडून जातीय, धार्मिक वाद घडवून आणले जात आहेत, असा आरोपही मायावती यांनी केला.

‘मदरशांची चौकशी, कबरी आणि शाळा पाडून टाकल्या जात आहेत’

लव्ह जिहाद, धार्मिक वाद, हिजाब या मुद्द्यांमुळे देशात तसेच उत्तराखंड, मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र अशा राज्यांत तणाव आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होत आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. मदरशांची चौकशी, कबरी आणि शाळा पाडून टाकणे अशा घटनांमुळेही तणाव निर्माण होत आहे. हे देशासाठी घातक आहे, अशी भूमिकाही बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मांडली.

बहुजन समाज पार्टी काय निर्णय घेणार?

दरम्यान, संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर जवळजवळ सर्व विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. तेव्हादेखील मायावती विरोधकांसोबत उभ्या राहिल्या नव्हत्या. त्यानंतर आता २३ जून रोजी होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीलाही त्या अनुपस्थित राहतील. त्यामुळे आगामी काळात बहुजन समाज पार्टी काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsp party chief mayawati will be absent in patna opposition party meeting on 23 june prd