पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि डाव्यांचा सुधारणावादी चेहरा म्हणून ओळख असलेल्या बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज गुरुवारी (८ ऑगस्ट) कोलकातामध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. पश्चिम बंगालमध्ये औद्योगीकरण आणण्याचे दूरगामी उद्दिष्ट असलेले ते मुख्यमंत्री होते. ते राजकारणाबरोबरच एक चांगले लेखकदेखील होते. २००० साली बुद्धदेव भट्टाचार्य राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आले. भारतात तोपर्यंत सर्वाधिक काळ एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले कम्युनिस्ट पक्षातील दिग्गज नेते ज्योती बसू यांचे उत्तराधिकारी म्हणून भट्टाचार्य यांची निवड करण्यात आली होती. २००१ साली सत्ताधारी माकपच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीने पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांपैकी १९९ जागांवर विजय मिळवला होता. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील डाव्यांचे प्राबल्य अधिकच वाढत गेले आणि २००६ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डाव्यांना तब्बल २३५ जागा मिळाल्या. आपल्या कार्यकाळामध्ये बुद्धदेव भट्टाचार्य यांनी राज्यामध्ये औद्योगीकरणाला चालना दिली. त्यांनी आयटी आणि आयटीईएस (Information technology enabled services) क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्याबरोबरच त्यांनी पश्चिम बंगालमधील सालबोनी येथे देशातील सर्वात मोठा इंटिग्रेटेड स्टील प्लांट, नयाचारमध्ये केमिकल हब, नंदीग्राममध्ये एसईझेड आणि सिंगूरमध्ये नॅनो प्लांट उभारण्याची योजना आखली होती. मात्र, नंदीग्राममधील एसईझेड (२००७) आणि सिंगूरमधील नॅनो प्लांटच्या (२००६) विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प प्रचंड वादात सापडले. खरे तर या आंदोलनांमुळेच भट्टाचार्य यांच्या नेतृत्वातील सरकारविरोधात असंतोषाची ठिणगी पडली.

हेही वाचा : बांगलादेश, श्रीलंका नि अफगाणिस्तान: अराजक असताना लोक ‘असे’ का वागतात?

Nanaji Deshmukh Panchayat Samiti tops state for Tiroda Panchayat Samiti Sustainable Development Award 2024
नानाजी देशमुख राष्ट्रीय पंचायतराज पुरस्काराने तिरोडा पंचायत समिती सन्मानित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका

भट्टाचार्य यांचा राजकीय अस्त, ममता बॅनर्जींचा उदय

या आंदोलनाच्या माध्यमातूनच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व राज्यामध्ये प्रस्थापित झाले आणि तत्कालीन सरकारविरोधात जनमताचा कौल आकार घेऊ लागला. खरे तर त्यावेळी राज्यात ममता बॅनर्जी एकट्याच माकपशी लढत होत्या. त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातूनच डाव्यांवर केलेल्या प्रहारामुळे तब्बल ३४ वर्षे सत्तेत असलेल्या डाव्यांच्या राजवटीला उतरती कळा लागली. १४ मार्च २००७ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १४ आंदोलकांचा मृत्यू झाला. वर्षभरानंतर टाटांनी नॅनो प्लांट गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या घटना भट्टाचार्य यांच्या सरकारसाठी मृत्यूकळाच ठरल्या. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नंदीग्राममधील एसईझेडचा निर्णयही मागे पडला. २०११ साली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसने डाव्यांची राजवट संपुष्टात आणली आणि ममता बॅनर्जी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या. या निवडणुकीमध्ये बुद्धदेव भट्टाचार्य यांना स्वत:च्याच जादवपूर मतदारसंघामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा डाव्यांच्या पराभवासाठी भट्टाचार्य यांना जबाबदार धरण्यात आले असले तरीही गेल्या १३ वर्षांपासून राज्यातील माकप पक्ष पुनरागमन करण्यासाठी आजतागायत धडपड करत आहे. २०१३ मध्ये भट्टाचार्य यांनी ‘एबीपी आनंद’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण औद्योगीकरणाचा आग्रह का धरला होता, याबाबत खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, “जर बंगालमध्ये औद्योगीकरणच नसेल तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींना रोजगार कुठून देणार? त्यांच्या भवितव्याचे काय? हा काही फक्त माकप वा तृणमूलचा विषय नाही.” नंदीग्राममध्ये झालेल्या मृत्यूंबाबतही त्यांनी खेद व्यक्त केला होता. ते म्हणाले की, “एखाद्या जबाबदार सरकारने जे करायला हवे, तेच तिथेही करण्यात आले. कोणत्याही सरकारने हेच केले असते. कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आली होती. मात्र, तिथे पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला नसता, तर अधिक चांगले झाले असते. प्रत्यक्ष मैदानात जे घडते ते प्रत्येकवेळी वरिष्ठ लोकांच्या हातात असतेच असे नाही. जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा मी विधानसभेत होतो आणि या घटनेची माहिती नंतर मिळाली. मला फार वाईट वाटले होते”, असेही ते म्हणाले.

राजकीय कारकीर्द

भट्टाचार्य यांनी १९६६ साली माकपचे सदस्यत्व घेऊन आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती. त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात दुष्काळाच्या परिस्थितीच्या विरोधात माकप पक्षाच्या अन्न चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. नंतर ते डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे राज्य सचिव बनले. १९७२ मध्ये त्यांची पक्षाच्या राज्य समितीवर निवड झाली आणि १९८२ मध्ये ते राज्य सचिवालयाचा भाग बनले. भट्टाचार्य यांनी कोसीपोर-बेलगाचिया मतदारसंघातून त्यांची पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी १९७७ ते १९८२ पर्यंत माहिती आणि जनसंपर्क मंत्री म्हणून काम केले. १९८२ मध्ये कोसीपूर मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर भट्टाचार्य यांनी जादवपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. १९८७ ते २०११ पर्यंत ते याच मतदारसंघातून जिंकत राहिले. १९८७ मध्ये त्यांना ज्योती बसू यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले. १९९३ मध्ये बसू यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिला. परंतु, काही महिन्यांनंतर ते पुन्हा सरकारमध्ये सामील झाले. १९९६ साली ते गृहमंत्री बनले. १९९९ साली ज्योती बसू यांची तब्येत खराब झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव पुढे करण्यात आले. ज्योती बसू पदावरून पायउतार झाल्यानंतर २ नोव्हेंबर २००० रोजी पहिल्यांदा भट्टाचार्य यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यानंतर त्यांची पक्षाच्या पॉलिटब्यूरो पदावरही नियुक्ती झाली. त्या काळात भट्टाचार्य राज्यातील सर्वोच्च पदावर विराजमान होते; तरीही त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना कोलकाता येथील बालीगंजमध्ये दोन खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या आणि आजही त्या याच ठिकाणी राहतात.

हेही वाचा : आर्थिक संकट, देशातून पलायन! श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर राजपक्षे कुटुंबाचा वंशज राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकू शकेल?

एक चांगला लेखक

बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रमुख ओळख राजकारणी म्हणून असली, तरीही त्या ओळखीच्या आड एक चांगला लेखकही दडलेला होता. त्यांना साहित्य आणि सांस्कृतिक घडामोडींमध्ये विशेष रुची होती. भट्टाचार्य यांनी एकूण आठ पुस्तकांचे लेखन केले होते. त्यामध्ये कोलंबियन लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्केझ आणि रशियन कवी व्लादिमीर मायाकोव्स्की यांच्या पुस्तकांच्या अनुवादाचाही समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी सत्ता गमावल्यानंतर भट्टाचार्य आमदार म्हणूनही पदावर राहिले नाहीत. ते नंतर राज्याच्या राजकारणात काही काळ सक्रिय राहिले; मात्र त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमधील सहभाग कमी केला. अलीकडच्या काही वर्षांमध्ये सातत्याने आजारी असल्यामुळे घरामध्येच त्यांचे वास्तव्य असायचे. एप्रिल २०१२ मध्ये आजारपणामुळे भट्टाचार्य यांना पक्षाच्या केरळमधील अधिवेशनाला हजेरी लावता आलेली नव्हती. त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव पक्षाच्या सर्वच पदातून मुक्त करण्याची मागणी केली. अखेर २०१५ साली ते सर्वच पदांमधून मुक्त झाले, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांची उपस्थिती फारच दुर्मीळ झाली. जानेवारी २०२२ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने भट्टाचार्य यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. मात्र, प्रसार माध्यमांशी बोलताना भट्टाचार्य यांनी आपण हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही असे म्हटले. ते म्हणाले की, “मला पद्मभूषण पुरस्काराबाबत काहीच माहिती नाही. त्याबाबत मला कुणीही काहीही बोलले नाही. जर मला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला असेल तर मी तो स्वीकारण्यास नकार देतो.” या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये डाव्या पक्षांनी काँग्रेसबरोबर एकत्र येत मैदानात उतरणे पसंत केले. तिसऱ्या टप्प्याआधी, माकपने भट्टाचार्य यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार करण्यात आलेल्या व्हिडीओचा वापर करून प्रचार केला होता. या व्हिडीओमध्ये भट्टाचार्य पश्चिम बंगालच्या लोकांना डाव्या आणि धर्मनिरपेक्ष पक्षांनाच मत देण्याचे आवाहन करताना दिसले होते.

Story img Loader