पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि डाव्यांचा सुधारणावादी चेहरा म्हणून ओळख असलेल्या बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज गुरुवारी (८ ऑगस्ट) कोलकातामध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. पश्चिम बंगालमध्ये औद्योगीकरण आणण्याचे दूरगामी उद्दिष्ट असलेले ते मुख्यमंत्री होते. ते राजकारणाबरोबरच एक चांगले लेखकदेखील होते. २००० साली बुद्धदेव भट्टाचार्य राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आले. भारतात तोपर्यंत सर्वाधिक काळ एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले कम्युनिस्ट पक्षातील दिग्गज नेते ज्योती बसू यांचे उत्तराधिकारी म्हणून भट्टाचार्य यांची निवड करण्यात आली होती. २००१ साली सत्ताधारी माकपच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीने पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांपैकी १९९ जागांवर विजय मिळवला होता. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील डाव्यांचे प्राबल्य अधिकच वाढत गेले आणि २००६ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डाव्यांना तब्बल २३५ जागा मिळाल्या. आपल्या कार्यकाळामध्ये बुद्धदेव भट्टाचार्य यांनी राज्यामध्ये औद्योगीकरणाला चालना दिली. त्यांनी आयटी आणि आयटीईएस (Information technology enabled services) क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्याबरोबरच त्यांनी पश्चिम बंगालमधील सालबोनी येथे देशातील सर्वात मोठा इंटिग्रेटेड स्टील प्लांट, नयाचारमध्ये केमिकल हब, नंदीग्राममध्ये एसईझेड आणि सिंगूरमध्ये नॅनो प्लांट उभारण्याची योजना आखली होती. मात्र, नंदीग्राममधील एसईझेड (२००७) आणि सिंगूरमधील नॅनो प्लांटच्या (२००६) विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प प्रचंड वादात सापडले. खरे तर या आंदोलनांमुळेच भट्टाचार्य यांच्या नेतृत्वातील सरकारविरोधात असंतोषाची ठिणगी पडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा