भंडारा : काँग्रेसकडून भंडारा मतदारसंघात पूजा ठवकर यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. यामुळे दलित समाजात नाराजी आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात बौद्ध दलित मतदारांची संख्या अधिक असून याच समाजातील उमेदवार द्यावा, अशी मागणी समोर आली आहे.

हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. येथे बौद्ध दलित मतदारांची संख्या सुमारे ९५ हजारांच्या घरात आहे. सर्वाधिक मतदार संख्या असली तरी २००९ पासून आतापर्यंत दलित समाजाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. काँग्रेसने पक्षातील बौद्ध दलित उमेदवाराला कायम डावलल्याचा आरोप होत आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने युवराज वासनिक यांनी उमेदवारी दिली होती, मात्र ते ग्रामीण भागातील असल्याने त्यांना पक्षांतर्गत विरोध झाला. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसने पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीरिपा) जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र जयदीप कवाडे यांना संधी दिली. त्यावेळी बाहेरच्या उमेदवाराला संधी दिल्याने स्थानिक काँग्रेस पक्षातील दलित नेते आणि कार्यकर्ते दुखावले गेले. एवढेच नाही तर त्यावेळी काँग्रेस पक्षातील बौद्ध दलित नेते आणि कार्यकर्ते यांनी भाजपच्या अरविंद भालाधरे यांना मतदान केले. बौद्ध दलित समाजाची ८२ हजार मते भालाधरे यांना तेव्हा मिळाली होती.

आणखी वाचा-भाजप मलकापूरमध्ये भाकरी फिरवणार? तीन दशकांनंतर बंडाची चिन्हे

लोकसभा निवडणुकीत फायदा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बौद्ध दलित समाजाच्या मतांचा फायदा झाला होता. बौद्ध दलित समाजाने लोकसभा निवडणुकीत त्यांची ताकद दाखविली, ज्याची परिणीती काँग्रेस उमेदवाराच्या विजयात झाली. आताही दलित बौद्ध आणि मुस्लीम समाजाने त्यांच्याच समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पक्षापक्षांत आणि गटागटांत विस्कळीत राहिलेल्या दलित समाजाने आता एकजुटीने समाजाच्याच उमेदवाराच्या पाठीशी ताकतीने उभे राहण्याचा निर्धार केला आहे. पक्ष न बघता केवळ दलित समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशी ठाम भूमिका या समाजाने घेतली आहे. मतदारसंघातील जातीय समीकरण बघता बौद्ध दलित मते यावेळी निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

आणखी वाचा-ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना

…अन्यथा मतदान न करण्याचा निर्णय

काँग्रेसकडून पूजा ठवकर यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असताना दलित बौद्ध समाज, काँग्रेस पक्षातील बौद्ध दलित नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसमधील दलित बौद्ध उमेदवारालाच संधी मिळावी, अशी आग्रही भूमिका समाजाने घेतली आहे. दलित बौद्ध उमेदवाराला डावलून इतर उमेदवाराला संधी दिल्यास समाज काँगेसला मतदान करणार नाही, असा ठराव बुधवारी आयोजित बैठकीत घेण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.