Buddhists Maha Kumbh: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात सेलिब्रिटी, सामान्य भाविक यांच्यासह विविध संघटनाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने एकत्र येत आहेत. सनातन धर्माचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी विविध संघटनांना एकत्र आणले जात आहे. संघाशी संलग्न असलेल्या विविध राज्यांतील आणि अनेक देशांतील शिष्टमंडळांना प्रयागराज येथे आणले गेले. उत्तर प्रदेश आणि भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी या शिष्टमंडळांना संबोधित केले आहे.

फेब्रुवारी महिन्यात कुंभ मेळ्यात ६०० बौद्ध भिख्खू आणि भाविकांनी हजेरी लावली आणि अमृतस्नानाचा लाभ घेतला. संघाशी संबंधित असलेल्या ‘धर्म संस्कृती संगम’च्या सहकार्याने विविध संघटनांना एकत्र आणले होते. या मेळ्याला बौद्ध महाकुंभ यात्रा, असे नाव देण्यात आले. ४ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बौद्ध शिष्टमंडळाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, हिंदू आणि बौद्ध या एकाच वृक्षाच्या शाखा आहेत.

दोन्ही धर्मांमध्ये एकता आणण्याच्या हेतूने ते म्हणाले, “जर हे दोन धर्म एकाच मंचावर आले, तर जगातील सर्वांत शक्तिशाली अशी ताकद निर्माण होईल.” ५ फेब्रुवारी रोजी बौद्ध महाकुंभ यात्रेचा शेवटचा दिवस होता. यावेळी जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशनंद गिरी यांनी संबोधित केले. तसेच त्यांच्या उपस्थितीत तीन ठराव करण्यात आले. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणे, तिबेटची स्वायत्तता आणि सनातन धर्म व बौद्ध धर्म यांच्यात एकता निर्माण करणे.

धर्म संस्कृती संगम या संस्थेचे पूर्व उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अरुण सिंह बौद्ध म्हणाले, आम्ही बौद्ध महाकुंभ यात्रेचे आयोजन केले आणि त्यानंतर चर्चासत्रही ठेवले. संपूर्ण भारत आणि जगभरातून ६०० बौद्ध नागरिकांनी एकत्र येत महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला, ही ऐतिहासिक बाब आहे. यातूनच सनातन आणि बौद्ध धर्म यांच्यात एकता होत असल्याचा संदेश दिला जात आहे.

आदिवासींसाठी जनजाती महाकुंभ

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या संघाशी संलग्न असलेल्या संस्थेने आदिवासींसाठी जनजाती महाकुंभ आणि आदिवासी युवकांसाठी युवा कुंभ यात्रेचे आयोजन केले होते. आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काहींनी सांगितले की, आदिवासी जमातींमधून १० हजार सदस्य या वर्षी कुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे ६ व ७ फेब्रुवारी रोजी युवा कुंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जुना आखाड्याचे स्वामी अवधेशनंद गिरी यांनी आपले विचार मांडले. तसेच केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनीही हजेरी लावली. उईके यांनी आदिवासी युवकांशी संवाद साधताना त्यांना समाजविरोधी शक्तींपासून दूर राहण्याचा संदेश दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

७ फेब्रुवारी रोजी नागालँड, मिझोराम, अंदमान, केरळ, हिमाचल प्रदेश आणि इतर राज्यांतील आदिवासींनी आपला पारंपरिक पोशाख परिधान करीत महाकुंभ मेळ्यात संगम घाटाकडे निघालेल्या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या हातात भगवे झेंडे होते. मिरवणूक संगम घाटाकडे पोहोचल्यानंतर आदिवासींनी गंगेत अमृतस्नान केले.

१० फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने संत समागमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनुसूचित जमातीमधील संत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबाळे यांनी संबोधित केले. त्यावेळी मंचावर आदिवासी समाजाचे महापुरुष बिरसा मुंडा यांचा फोटो लावण्यात आला होता. सनातन संस्कृतीला बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन होसबाळे यांनी केले.

विहिंप आणि अभाविपकडूनही कार्यक्रम

संघाव्यतिरिक्त विश्व हिंदू परिषदेनेही कुंभ मेळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विहिंपकडून ‘मंदिरमुक्ती आंदोलन’ संबंध देशभरात पसरविण्यासाठी ७ फेब्रुवारीपासून तीन दिवसांची राष्ट्रीय स्तरीय चर्चा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात विहिंपचे प्रतिनिधी देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हिंदू मंदिरे हिंदू समुदायाला परत करण्यासाठी निवेदन देतील.

संघाची आणखी एक संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कुंभ मेळ्यात तरुणांसाठी शिबिरे घेण्यात येत आहेत. कुंभ मेळ्याच्या सांस्कृतिक महत्त्वावर अलीकडेच त्यांच्या वतीने जागतिक चर्चा घेण्यात आली होती.

Story img Loader