“भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून झालेली हत्या आणि त्यानंतर देशात काही ठिकाणी उसळलेल्या शीख विरोधी दंगली, शीखांकडून केली जाणारी वेगळ्या खलिस्तानची मागणी यानंतर हिंदूकडूनही प्रतिकार होण्याची शक्यता होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने ४१४ जागांवर विजय मिळवून मोठ्या बहुमताने सत्ता स्थापन केली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. राजीव गांधी पंतप्रधान असताना शाहबानो खटल्यानंतर समान नागरी कायद्याचा मुद्दा पुढे आला. तर त्यानंतर राम मंदिराचे आंदोलन सुरू झाले. राजीव गांधी यांचे चुलत भाऊ अरुण नेहरु यांनी सत्तेत कायम राहण्यासाठी तीन सल्ले राजीव गांधी यांना दिले होते. द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादक नीरजा चौधरी यांचे “हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड” हे पुस्तक प्रकाशित झाले असून या पुस्तकात नीरजा चौधरी यांनी याबाबत रोचक माहिती दिली आहे. “राम मंदिराचे निर्माण, समान नागरी कायदा लागू करणे आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकणे”, असे तीन सल्ले अरुण नेहरु यांनी राजीव गांधी यांना दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड” या पुस्तकातील महत्त्वाच्या मजकुराबाबतच ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे पत्रकार मनोज सी. जी. यांनी नीरजा चौधरी यांची मुलाखत घेतली आणि भारताच्या माजी पंतप्रधानांनी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा ऊहापोह केला.

हे ही वाचा >> इंदिरा गांधी यांनी आणीबाणी का लादली? आणीबाणीची प्रमुख कारणे कोणती?

इंदिरा गांधी हिंदुत्वाकडे कशा झुकल्या?

आणीबाणी लादणे आणि त्यानंतर जनता पक्षाच्या अंतर्विरोधातून सरकार कोसळण्यात संजय गांधी यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही नीरजा चौधरी यांनी पुस्तकात नमूद केले आहे. आणीबाणी लादण्यासाठी इंदिरा गांधी यांचे मन वळविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींवरील संकट वाढविण्यातही ते कारणीभूत ठरले होते. मात्र, यातूनही पुन्हा सत्ता स्थापन करण्यात संजय गांधींचा मोठा आधार मिळाल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांच्या नसबंदी कार्यक्रमामुळे मुस्लीम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. त्यामुळे आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी हिंदुत्वाकडे झुकल्याचे निरीक्षण नीरजा चौधरी यांनी नोंदवले आहे.

राजीव गांधी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संबंध

१९८० साली पुन्हा सत्तेत आल्यानंतर इंदिरा गांधी यांनी राजीव गांधींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे भाऊ भाऊराव देवरस यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्यांचा संघाच्या विचारधारेवर विश्वास होता, अशातला काही भाग नव्हता. पण, त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचा त्यांनी अचूक अंदाज घेतला होता. सोनिया गांधी हे संघाच्या कट्टर विरोधक असल्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील नेत्यांशी झालेल्या संवादाबद्दल घरात बोलू नये, असेही इंदिरा गांधी यांनी राजीव गांधींना सांगितले होते, असा दावा नीरजा चौधरी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. भाऊराव देवरस यांच्यासोबत पुढे राजीव गांधी यांच्या अनेकदा गाठीभेटी झाल्या.

अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर होती संघाची नाराजी

जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर १९८० साली इंदिरा गांधींनी लोकसभेत मोठ्या बहुमताने विजय मिळवला होताच; मात्र त्यानंतर झालेल्या दिल्ली आणि जम्मूतील स्थानिक निवडणुकांमध्येही हिंदूंच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणली. भाजपासाठी हा निकाल धक्कादायक होता. त्यावेळी या विजयात संघाचा हात असल्याचे अनेकांचे मत झाले होते. एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे इंदिरा गांधी यांनी मोठ्या कौशल्याने अनेक पातळ्यांवर आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. एका बाजूला हिंदूंपर्यंत पोहोचत असताना त्यांनी मुस्लीमविरोधी दिसेल, असे कोणतेही विधान किंवा कृत्य केले नाही. १९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी देशभरातील अनेक हिंदू मंदिरांत दर्शनासाठी जात होत्या. त्या श्रद्धाळू हिंदू असून, त्या हिंदूंचा चेहरा बनू शकतात, अशी संघाची अटकळ होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी मात्र धर्मनिरपेक्ष असल्याचे दिसत होते. बिगर हिंदूंनादेखील संघात प्रवेश मिळावा, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता; ज्यावर संघातूनच टीका झाली, असेही नीरजा चौधरी यांनी पुस्तकात म्हटले आहे.

आणखी वाचा >> अटल बिहारी वाजपेयी जनसंघाच्या वेशातले ‘नेहरूवादी’; वाजपेयींना नेहरूंचे वावडे नव्हते?

अरुण नेहरू कोण होते?

अरुण नेहरू हे काँग्रेसमधील एकेकाळी महत्त्वाचे शिलेदार होते. इंदिरा गांधी यांचे चुलतभाऊ आनंद कुमार यांचे ते सुपुत्र. १९४४ साली जन्म झालेल्या अरुणकुमार यांचा राजकारणातील प्रवेश व्ही. पी. सिंह यांच्यामुळे झाला. १९८० साली इंदिरा गांधी रायबरेली आणि आंध्र प्रदेशमधील मेडक अशा दोन जागी निवडणुकीसाठी उभ्या होत्या. दोन्ही ठिकाणी विजय मिळवल्यानंतर त्यांनी रायबरेलीचा राजीनामा दिला. त्यानंतर अरुण नेहरू यांना ही जागा देण्यात आली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांचा पाठीराखा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. २५ जुलै २०१३ रोजी त्यांचे निधन झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Build a ram temple bring the uniform civil code and abrogate article 370 what arun nehru told his cousin rajiv gandhi kvg