बुलढाणा : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक ‘यांचा जिल्हा’ अशी बुलढाण्याची ओळख. काँग्रेसचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला राहिलेल्या बुलढाण्यात यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसवर पराभवाची नामुष्की ओढवली. जिल्ह्यातील चारही जागांवर काँग्रेस उमेदवाराला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. अलीकडच्या काळातील हा काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. यामुळे मुकुल वासनिक यांची दिल्ली दरबारी अडचण होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळचे नागपूरकर असलेले मुकुल वासनिक हे नागपूर विद्यापीठ निवडणूक आणि युवा चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व. त्यांचे वडील बाळकृष्ण वासनिक १९८० साली राखीव असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार झाले. यापाठोपाठ १९८४ मध्ये मुकुल वासनिक बुलढाण्याचे खासदार झालेत. यातून त्यांनी बुलढाणा जिल्हा काँग्रेसमध्ये नियोजितपणे वर्चस्व निर्माण केले. १९८४ ते २००४ पर्यंत त्यांनी बुलढाण्यातूनच लोकसभा लढवली. तीनदा खासदारकी मिळवली. पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात केंद्रीय क्रीडा युवक कल्याण राज्यमंत्री झाले. यामुळे त्यांचे बुलढाण्यासोबत राजकीय, भावनिक ऋणानुबंध राहिले व ते आजही कायम आहेत.

हेही वाचा – Narasayya Adam: नरसय्या आडम राजकारणातून निवृत्त; सोलापुरातील दारुण पराभवानंतर निर्णय

‘मुकुल वासनिक बोले अन् जिल्हा काँग्रेस हले,’ अशी स्थिती कायम असल्याने बुलढाणा जिल्हा मुकुल वासनिक यांचा, अशी ओळख काँग्रेस मुख्यालयात निर्माण झाली आहे. यंदाच्या विधासभेतही चार जागांचे उमेदवार त्यांनीच ठरवले. प्रचारादरम्यान जिल्ह्यात दोनदा हजेरी लावली. गटबाजी दूर करून सर्वांना कामाला लावले. मलकापूरमधील माजी नगराध्यक्ष हरीश रावळ, मेहकरमधील लक्ष्मण घुमरे यांचे बंड थंड केले. याउपरही जिल्ह्यात काँग्रेसला ‘व्हाइटवॉश’ मिळाला. एकाही जागी विजय न मिळाल्याने जिल्ह्यातून पंजाच गायब झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, दिलीपकुमार सानंदा व राजेश एकडे हे दोन माजी आमदार आणि माजी आमदारांची कन्या स्वाती वाकेकर पराभूत झाल्याने पक्ष तोंडघशी पडला आहे.

हेही वाचा – महायुतीच्या संयुक्त बैठकीची प्रतीक्षा; दिल्लीतील चर्चेबाबत अद्याप निर्णय नाही

मुकुल वासनिक यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरला आहे. त्यांची दिल्ली दरबारी अडचण आणि नाचक्की झाली आहे. निकालाने त्यांच्यावर चिंता आणि चिंतनाची वेळ आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana district assembly election result congress defeat mukul wasnik delhi print politics news ssb