बुलढाणा: बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत नव्हे रणसंग्राम रंगला आहे. शिवसेनेतील महा बंडाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही लढत वरकरणी उमेदवारामध्ये आहे. मात्र अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष व वर्चस्वाची लढत आहे. बुलढाण्याच्या निकालाचे पडसाद केवळ जिल्हाच नव्हे तर, ‘मातोश्री’ व ‘वर्षा’पर्यंत उमटणार आहे.

शिंदे यांच्या बंडाला बुलढाणा जिल्ह्यातून मोठी कुमक मिळाली. खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमदारद्वय संजय रायमूलकर व संजय गायकवाड हे मुंबई, सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले. सलग तीनदा आमदार झालेले रायमूलकर आणि प्रथमच आमदार झालेले गायकवाड हे बंडाळीत सहभागी झाले. यानंतर सलग तीनदा खासदार झालेले प्रतापराव जाधव दिल्लीत पुढाकार घेत शिंदे गोटात सहभागी झाले. सिंदखेडराजाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर, काही पदाधिकारी देखील शिंदे सेनेत गेले. जिल्हा सेनेत देखील फूट पडली. मात्र बहुसंख्य पदाधिकारी, शिवसैनिक ठाकरे सेनेत राहिले. त्यांना नेतृत्वाची संधी मिळाल्याने त्यांनी ठाकरे सेना टिकवून ठेवली. बुलढाणा मतदारसंघात शिंदे सेनेने ठाकरे गटाच्या कार्यक्रमात राडा केला, मोताळ्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे ठाकरे गट एकवटल्याचे दिसून आले. त्यांना पाठबळ देण्याचे काम वरून करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ने बंडखोरांचे तळ असलेल्या बुलढाण्यासारख्या लोकसभा मतदारसंघाना फार पूर्वीपासून डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना केली. बंडाळीनंतरच्या उद्धव ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात देखील बुलढाण्याचा समावेश होता. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी जिल्हा दौरा केला. फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे दौरे झाले. शेजारील जिल्ह्यातील अंबादास दानवे बुलढाण्याकडे लक्ष ठेवून होते. नेते अरविंद सावंत यांनी नंतर बुलढाण्याची धुरा सांभाळली. अलीकडे मुंबईचेच राहुल चव्हाण पंधराएक दिवस जिल्ह्यात तळ ठोकून राहिले. यामुळे ठाकरे गट बुलढाण्यासाठी किती संवेदनशील आणि विजयासाठी किती आग्रही आहे हे स्पष्ट होते.

हेही वाचा – “रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप

गद्दारी, बंडखोरी, मतदारसंघाचा अविकसितपणा यावर जोर देऊन खासदार जाधव यांना जाणीवपूर्वक ‘लक्ष्य’ करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी अगोदरच जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांचे नाव पक्के केले होते. तीन पक्षांमध्ये समन्वय साधण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी आयोजित सभेला आदित्य ठाकरे, दानवे, सुषमा अंधारे ,रोहित पवारांनी हजेरी लावली. काँग्रेसच्या एका गटाची नाराजी लगेच दूर करण्यात आली.

हेही वाचा –  ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?

शिंदे गटाचे नियोजन

दुसरीकडे बुलढाणा व येथील विजय शिंदे गट किंबहुना थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेची बाब ठरली आहे. भाजपा अंतिम टप्प्यापर्यंत बुलढाणासाठी आग्रही होती. त्यांनी दिल्लीपर्यंत कथित सर्वेक्षणचा मुद्दा रेटला. मात्र शिंदे दबावातही बुलढाणा व खासदार जाधव यांच्यासाठी ठाम राहिले. नामांकनच्या पहिल्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरून भाजपावरील दबाव वाढविला. त्याला ‘वरून’ संमती होती. त्याच दिवशी संध्याकाळी जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या नामांकन निमित्त महायुतीने गुलाब पाटील यांना पाचारण करण्यात आले. युतीचे चार आमदार, पदाधिकारी असा लवाजमा जमवून शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. राजकारण व निवडणूक लढविण्याचा दीर्घ अनुभव, खासदारकीची हॅटट्रिक करणाऱ्या मुरब्बी राजकारणी असलेल्या जाधवांना यंदाही विजयाची खात्री आहे. राजेंद्र शिंगणेसारख्या नेत्याला दोनदा पराभूत केल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास असणे स्वाभाविक आहे. आता तर शिंगणेच सोबत असल्याने त्यात भरच पडली आहे.

Story img Loader