सध्या काँग्रेस पक्षांतर्गत संक्रमणाच्या काळातून मार्गक्रमण करत आहे. जुन्या जेष्ठ नेत्यांना सांभाळून नवीन नेत्यांना संधी देण्याची कसरत काँग्रेस नेतृत्वाला करावी लागते आहे. उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक महत्वाचे निर्ण घेतले गेले. यामधील काही निर्णय हे पक्षाची चिंता वाढवणारे आहेत. काँग्रेसने यावर्षी २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी ‘भारत जोडो यात्रा’ काढण्याचे ठरवले आहे. भारत जोडो यात्रा ही व्यापक स्वरूपात करणार असल्याचे संकेत काँग्रेसकडून मिळत आहेत. समविचारी राजकीय पक्ष आणि सामाजिक गटांशी संपर्क साधून ही यात्रा व्यापक करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
कशी असेल ‘भारत जोडो यात्रा’
काँग्रेस समविचारी पक्ष आणि सामाजिक घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. संविधानावरील हल्ले, धर्मनिरपेक्षतेवर हल्ला, नफ्यात असलेल्या सरकारी उपक्रमांची विक्री हे या यात्रेतील प्रमुख मुद्दे असणार आहेत. समविचारी पक्षांच्या सहभागाबद्दलची अजून काही ठाम रुपरेषा ठरवण्यात आलेली नाही. काँग्रेस कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेबाबत समन्वय साधण्यासाठी आणि अंतिम स्वरूप देण्यासाठी एक गट बनवण्यात येणार आहे. तामिळनाडूतील द्रमूक येथून ही यात्रा सुरू होईल आणि पुढे मार्गक्रमण करेल. यामध्ये महाराष्टातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनासुद्धा यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
प्रादेशिक पक्षांची नाराजी
काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की यात्रेला मोठे आणि व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी प्रादेशिक पक्षांकडे विचारधारा नसल्याचं विधान राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधी यांच्या या विधानामुळे मित्रपक्ष असणारे राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेसारखे प्रादेशिक स्तरावर ताकद असलेले पक्ष नाराज झाले आहेत. मात्र प्रादेशिक पक्ष नाराज असल्याच्या वृताचा काँग्रेस नेत्यांनी दुजोरा दिला नाही. “आम्ही जिथे कमजोर आहोत तिथे प्रादेशिक पक्षांना उचित सहकार्य करू मात्र याचा अर्थ असा होत नाही की या राज्यात आम्ही निवृत्ती घेऊ”.
यात्रेचा मार्ग
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही यात्रा चार ते महिने चालण्याची शक्यता आहे. सुमारे १२ राज्यांतून ३५०० किलोमीटरचा प्रवास करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. जेव्हा काँग्रेसच्या नेतृवाखालील यूपीए सरकार होते तेव्हा काँग्रेसकडे सल्लागार परिषदेच्या रुपात सामाजिक संस्थांचं जाळे होते. आता काँग्रेस वेगवेगळ्या नागरी गटांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे.