सौरभ कुलश्रेष्ठ

विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारी अर्जातून महाविकास आघाडीतील मतांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा आपला मानस व्यक्त करणाऱ्या भाजपने आता खोत यांना अर्ज मागे घ्यायला लावला आहे. खोत यांच्या उमेदवारीमुळे बेछूट फोडाफोडी होऊन निकाल अनिश्चित होऊ शकतो. त्याऐवजी भाजपचे पाचवे उमेदवार  प्रसाद लाड यांचा विजय केंद्रस्थानी ठेवून आघाडीत बिघाडी निर्माण करण्यासाठी नेमकी फोडाफोडी करण्याची नियोजनबद्ध खेळी करण्याची रणनीती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आखल्याचे स्पष्ट होत आहे. 

सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला नव्हता. राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा गनिमी कावा यशस्वी होऊन महाविकास आघाडीची मते फुटली आणि भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आता त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. राज्यसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती विधान परिषदेत करण्याचा भाजपचा प्रयत्न करणार हे उघड आहे.  विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होत आहे. विजयासाठी २७ मतांचा कोटा आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात व दोन्ही पक्षांनी तेवढेच उमेदवार उभे केले आहेत. पक्षाच्या आमदारांच्या संख्याबळानुसार कॉंग्रेसचा एक तर भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. पण कॉंग्रेसने दुसरा तर भाजपने प्रसाद लाड यांच्या रूपात पाचवा उमेदवार दिला आहे. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी अर्ज भरला व त्याला भाजपने पाठिंबा दिल्याने ते भाजपकडून सहावे उमेदवार ठरले होते. त्यातून गुप्त मतदान असलेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतांची मोठ्या प्रमाणात फोडाफोडी करण्याचा भाजपचा मानस स्पष्ट झाला होता. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी सदाभाऊ खोत यांनी, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे जाहीर केले. शेवटच्या दोन तासांपर्यंत अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय झाला नव्हता. पण अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला.

सध्या प्रसाद लाड यांच्या रूपात अतिरिक्त उमेदवार भाजपतर्फे आहे. खोत यांच्यारूपात दुसरा अतिरिक्त उमेदवार दिल्यास बेछूट फोडाफोडीत गणित बिघडू शकते. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे  विधान परिषदेत प्रसाद लाड यांच्या रूपात अतिरिक्त उमेदवार देऊन विजय केंद्रस्थानी ठेवून समीकरणांची मांडणी करण्यात येणार आहे. त्यातून आघाडीच्या मतांची नेमकी फोडाफोड करून त्याचे रूपांतर लाड यांच्या विजयात होईल असे गणित मांडण्यात येत आहे. आता लाड यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप हे अडचणीत असल्याचे वरकरणी दिसत असले तरी प्रत्यक्षात शिवसेनेच्या उमेदवाराची आणि राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले एकनाथ खडसे यांची मते फोडून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करणार हे स्पष्ट आहे.

Story img Loader