सौरभ कुलश्रेष्ठ
मुख्यमंत्री झाल्यानंतरची दोन वर्षे विविध कारणांमुळे आमदार-पक्ष पदाधिकाऱ्यांशी थेट भेटीगाठींपासून दूर राहिल्यानंतर आता गेल्या दीड-दोन महिन्यांत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे आमदार-खासदारांसह विविध पातळीवरील संघटनात्मक पदाधिकाऱ्यांबरोबर बैठकांचे सत्र सुरू केले असून जणू काही पक्षपातळीवरील भेटी-संवादाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न ठाकरे करत असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर चार महिन्यांत मार्च २०२० मध्ये करोनाच्या साथीमुळे देशव्यापी टाळेबंदी लागली. काही महिन्यांत टाळेबंदी शिथील झाल्यानंतरही विविध निर्बंध आणि करोनाची साथ कायम होती. या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व इतर नेते यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी इतर पक्षातील सर्व वरिष्ठ नेते राज्यातील विविध भागांचे दौरे करत होते व पक्षाच्या आमदार-खासदारांसह पक्ष पदाधिकाऱ्यांशी सातत्याने भेटीगाठी घेत संवाद आणि पक्षबांधणी सुरू होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या काळात विविध प्रादेशिक विभागांत पक्षाची संपर्क मोहीम राबवली. मात्र या काळात प्रकृतीच्या कारणास्तव खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारी आणि महापुराच्या नुकसानीची पाहणी करणारा दौरा असे अपवाद वगळता भेटीगाठी व थेट संपर्क कमी केला होता. त्यामुळे शिवसेनेचे मोजके नेते वगळता पक्षाचे आमदार, खासदार, पक्ष पदाधिकारी व ठाकरे यांच्या भेटी-संवाद आटला होता. इतर पक्षांचे नेते आपल्या लोकप्रतिनिधींना व पक्ष पदाधिकाऱ्यांना राजकीय ताकद देत असताना आपल्या पक्षात मात्र तसे होत नसल्याची भावना व त्यातून अस्वस्थता शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. याचेच पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी आमच्या भागातील कामांना निधी मिळत नाही, शिवसेनेच्या आमदारांवर निधी वाटपात अन्याय होतो अशी नाराजी व्यक्त केली.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटींचे सत्र सुरू केले. विधिमंडळ अधिवेशनावेळी शिवसेना आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजन करत भेटी-संवाद सुरू केला. त्यानंतर पक्षप्रवक्ते आणि खासदारांसाठी स्नेहभोजन व बैठक ठेवली आणि १४ मे रोजी वांद्रे येथे जाहीर सभा घेतली. आजारपणामुळे उद्धव ठाकरे आता घरातच असतात हा संदेश देऊन त्यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेच्या आक्रमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची खेळी भाजपने खेळली होती. जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पुन्हा मैदानात उतरल्याचा व आक्रमक झाल्याचा संदेश शिवसैनिकांना व त्यांच्या मतदारांना दिला आहे.
त्यानंतर लगेचच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेत निवडणुका कधीही होऊ देत तुम्ही तयारीला लागा असा आदेश दिला. त्यानंतर कोकण, विदर्भ आदी विभागातील आमदारांच्या बैठका घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर बुधवारी १८ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. पक्षसंघटना बळकट करणे, आमदारांची कामे मार्गी लावण्यासाठी जबाबदारी वाटून घेऊन रचना लावणे, लोकोपयोगी कामांसाठी संस्थात्मक काम उभे करणे आणि राज्यसभा निवडणुकीत दुसरी जागा जिंकायचीच याविषयांवर यावेळी चर्चा झाली.
एकप्रकारे गेल्या दोन-अडीच वर्षांतील पक्ष संघटना, पक्षाचे आमदार-खासदार, मंत्री यांच्या भेटीगाठी आणि संवादाचा अनुशेष तयार झाला होता. तो अनुशेष या बैठकसत्रांमधून दूर करण्याचा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षसंघटना व नेत्यांना सक्रीय करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. पण त्यातून या सर्व बाबतीत अखंड कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी-भाजपच्या तुलनेत शिवसेनेला यश मिळेल का याबाबत उत्सुकता असणार आहे.