नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात २०१९ मधील निवडणुकीच्या तुलनेत ५.६७ टक्क्यांनी मतदान वाढले. यंदा वाढलेल्या ३३ हजार ९७१ मतांवरच येथील उमेदवाराच्या विजयाचे भाग्य ठरणार आहे. येथील हलबा समाजाच्या मतविभाजनामुळे भाजप व काँग्रेस पक्षाची धाकधूकही वाढली आहे.
मध्य नागपुरातून भाजपकडून प्रवीण दटके, काँग्रेसकडून बंटी शेळके, अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांच्यात तिरंगी लढत आहे. येथे हलबा आणि मुस्लिम समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यंदाच्या निवडणुकीत (२०२४) येथे १ लाख ६८ हजार १०७ पुरुष, १ लाख ७३ हजार २२ महिला, ४० इतर संवर्गातील असे एकूण ३ लाख ४१ हजार १६९ मतदार आहे. त्यापैकी १ लाख १६१ पुरुष, ९४ हजार ८८८ महिला, ११ इतर संवर्गातील अशा एकूण १ लाख ९५ हजार ६० मतदारांनी मतदान केले. या मतदानाची टक्केवारी ५७.१७ टक्के आहे. २०१९ मधील (५१.५ टक्के) निवडणुकीच्या तुलनेत येथे मतदान ५.६७ टक्यांनी वाढले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत येथे ३ लाख १७ हजार ९६ मतदारांपैकी १ लाख ६१ हजार ८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. परंतु यंदा २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये वाढलेल्या ३३ हजार ९७१ मतदारांचा कौल कोणाकडे त्यावरच येथील उमेदवाराचे भाग्य ठरणार आहे. येथे मुस्लीम समाजाचा कल काँग्रेसकडे तर हलबा समाजाचा कल भाजपकडे सहसा दिसतो. यंदा भाजप-काँग्रेस या दोन्ही पक्षांनी येथून हलबा समाजाला उमेदवारी न दिल्याने समाजाने पुणेकर यांना उभे केले. समाजाचा रोष बघता भाजप- काँग्रेसकडून या समाजाची समजुतीचा एकीकडे प्रयत्न तर दुसरीकडे इतर समाजाला स्वत:कडे वळवण्याचे प्रयत्न झाले. काँग्रेसनेही हलबाबहुल क्षेत्रात बऱ्याच नेत्यांच्या सभा घेत मोमीनपुरा या मुस्लीमबहुल भागात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची तर बडकस चौकात प्रियंका गांधी यांची रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले.
हेही वाचा – पश्चिम नागपूरध्ये लाडक्या बहिणींचे मतदान अधिक, कौल कुणाला?
रमेश पुणेकर यांनीही हलबा समाजातर्फे सभांचा सपाटा लावत गोळीबार चौकात मोठी सभा घेत शक्तिप्रदर्शन केले. तर मुस्लीमबहुल भागात हलबा- मुस्लिम भाई- भाईसह विणकर एकता जिंदाबादचेही नारे लावून या समाजाला आकर्षित करण्याचेही प्रयत्न झाले. दुसरीकडे भाजपकडून येथे ‘बटेंगे तो कटेंगे’सह येथे हिंदू मतांचे विभाजनातून काँग्रेस उमेदवार निवडून येण्याची भीतीही दाखवली गेली. तर गडकरींनी मतदानाच्या दिवशी गोळीबार चौकात बुथवर बसून मतचिठ्ठ्यांचे काही वेळ वाटपही केले. त्यानंतर हलबा समाजाचा कल निवडणुकीदरम्यान अपक्ष उमेदवार पुणेकर यांच्याकडेही दिसत होता. दुसरीकडे मुस्लीम समाजाचा कल काँग्रेसकडे दिसत होता. तर महाल परिसरात ओबीसी समाजाचा कल भाजपकडे होता. परंतु हलबा समाजाच्या मतविभाजनाची भाजपला संभावित हाणी इतर समाजातील वाढीव मतातून भाजप भरून काढणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.