अमरावती : जिल्‍ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्‍ये बंडखोरीचे चित्र आहे. मोर्शी मतदारसंघात तर महायुतीचे दोन घटक पक्ष भाजप आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमने-सामने आले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरांना शांत करण्‍याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, अनेक ठिकाणी बंडखोरांनी ‘लढणार आणि जिंकणार’ असा पवित्रा घेतल्‍याने अडचणी कायम आहेत. बंडखोरीचा फटका दोन्‍ही आघाड्यांना बसण्‍याची चिन्‍हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोर्शी मतदारसंघात नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. आमदार देवेंद्र भुयार यांना राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने उमेदवारी दिली. सोबतच भाजपने उमेश यावलकर यांना उमेदवारी घोषित केली. आता या ठिकाणी कुणी माघार घेणार की मैत्रिपूर्ण लढत होणार, हे येत्‍या ४ नोव्‍हेंबरपर्यंत स्‍पष्‍ट होणार आहे. मोर्शीचे राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार गिरीश कराळे यांच्‍या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांच्‍यासह मनोहर आंडे यांनी देखील बंडखोरी केली आहे. भाजपचे बंडखोर श्रीधर सोलव यांनीही अर्ज दाखल केला आहे. बंडखोरांची समजूत काढण्‍याचे प्रयत्‍न सुरू आहेत.

हेही वाचा – स्वपक्षातील बंडखोरांचे आव्हान थोपविण्यासाठी कसरत! महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजांची मनधरणी सुरू

मेळघाटमध्‍ये भाजपचे केवलराम काळे यांच्‍या विरोधात भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, ज्‍योती सोळंके यांनी बंडखोरी केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे डॉ. हेमंत चिमोटे यांच्‍या विरोधात मन्‍ना दारसिंबे यांनी रणशिंग फुंकले आहे. दर्यापूरमध्‍ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात महायुतीचा घटक असलेल्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाने भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना रिंगणात आणले आहे. त्‍यांच्‍या माघारीची शक्‍यता कमी आहे. भाजपचे बंडखोर सिद्धार्थ वानखडे यांनीही अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला मिळाल्‍याने काँग्रेसच्‍या उमेदवारीची तयारी ठेवून असलेले गुणवंत देवपारे, रामेश्‍वर अभ्‍यंकर हेही मैदानात आहेत.

बडनेरामध्‍ये युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्‍या विरोधात भाजपचे बंडखोर तुषार भारतीय आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सुनील खराटे यांच्‍या विरोधात प्रीती बंड या बंडाचा झेंडा घेऊन लढतीत आहेत. दोघांचीही माघारीची शक्‍यता कमी आहे.

हेही वाचा – दिवाळी सणामुळे विधानसभा निवडणूक प्रचाराला खंड

अमरावतीत राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्‍या सुलभा खोडके यांच्‍या विरोधात भाजपचे बंडखोर जगदीश गुप्‍ता यांनी निवडणूक लढण्‍याचा निश्‍चय केला आहे. अचलपूरमध्‍ये भाजपचे प्रवीण तायडे यांच्‍या विरोधात भाजपचे बंडखोर अक्षरा लहाने, नंदकिशोर वासनकर आणि ठाकूर प्रमोदसिंह गडरेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, यापैकी कोण माघार घेणार, याचे औत्‍सुक्‍य आहे. तिवसामध्‍ये भाजपचे राजेश वानखडे यांच्‍या विरोधात रविराज देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. अनेक बंडखोरांनी कार्यकर्त्‍यांशी चर्चा करून माघारीचा किंवा लढतीचा निर्णय ४ नोव्‍हेंबरपर्यंत घेऊ असे सांगितले आहे.