नवी दिल्ली : हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची गुरुवारी सांगता झाली असून ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये राहुल गांधी यांनी सलग तीन दिवस ‘संकल्प यात्रे’तून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर, भाजपचा भर मोदी-शहा, राजनाथ-नड्डा आणि योगी आदित्यनाथ आदी प्रमुख नेत्यांच्या जनसभांवर राहिला. यावेळी सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या निवडणुकीत हरियाणात प्रमुख जाट समूह काँग्रेसच्या बाजूने एकवटल्याचे दिसत असून मुस्लीम व दलित मतांच्या पाठिंब्यावर भाजपचा पराभव करण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे. काँग्रेसने २६ जाट, २० ओबीसी, १७ दलित, ११ पंजाबी हिंदू तसेच शीख, ६ ब्राह्मण, ५ मुस्लीम, २ बनिया व राजपूत, बिश्नोई व रोर समाजातील प्रत्येकी एकाला उमेदवारी दिली आहे. भाजपने २१ ओबीसी, १७ जाट, ११ ब्राह्मण, ११ पंजाबी हिंदू, ५ बनिया व २ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचा ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न

हरियाणामध्ये जाट सुमारे ३० टक्के, दलित २० टक्के, मुस्लीम ७ टक्के तर ओबीसी सुमारे ४० टक्के आहेत. यापैकी जाट, दलित व मुस्लीम एकत्र आले तर काँग्रेसला सहज विजय मिळू शकतो. त्यामुळेच काँग्रेस अंतर्गत जाट व दलित नेत्यांमधील (भूपेंद्र हुड्डा विरुद्ध सेलजा) मतभेदाचा मुद्दा ऐरणीवर आणून काँग्रेस दलितविरोधी असल्याचा जोरदार प्रचार भाजपने शेवटच्या टप्प्यामध्ये केला. हरियाणामध्ये प्रभावी जाट समाज एकत्र आल्यामुळे जाटेतर मतदारांचे ध्रुवीकरण होण्याचा धोका ओळखून ‘आमचा पक्ष ३६ बिरादरींचा आहे’, असा प्रचार काँग्रेसने केला.

हेही वाचा >>> शत प्रतिशत’चा नारा देत भाजप पुन्हा जुन्या वळणावर

भाजपसाठी ३६ बिरादरी-दलितांचा कौल निर्णायक

हरियाणातील समाज प्रामुख्यानें ३६ बिरादरीमध्ये विभागला गेल्याचे मानले जाते. त्यामध्ये जाट समाज असला तरी प्रामुख्याने ब्राह्मण, बनिया, गुर्जर, राजपूत, पंजाबी हिंदू, सैनी, सोनार, अहिर, कुंभार, बिश्नोई, धोबी, तेली अशा अनेक जाटेतरांचा समावेश होतो. हे समाज गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपसोबत राहिलेले आहेत.

आधी भाजपचा प्रचार नंतर काँग्रेस प्रवेश

ज्येष्ठ भाजप नेते अशोक तन्वर यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महेंद्रगढ जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. काँग्रेसप्रवेशापूर्वी काही तास आधी त्यांनी सेफीडोन मतदारसंघात भाजपचा प्रचार केला होता. ४८ वर्षीय तन्वर यांनी यावर्षी जानेवारीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दलित नेते अशी ओळख असलेले तन्वर हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. देवाच्या इच्छेनुसार काँग्रेस प्रवेश केल्याचे तन्वर यांनी नमूद केले.

काँग्रेसचे प्रचारातील मुद्दे

● शेतकरी आंदोलन,

● महिला कुस्तीगीर आंदोलन,

● अग्निवीर योजना, 

● बेरोजगारी, 

● संविधान बचाओ.

भाजपचे प्रचारातील मुद्दे

● अग्निविरांना नोकऱ्यांची हमी

● छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण,

● काँग्रेस दलितविरोधी.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campaigning ends for haryana assembly election 2024 print politics news zws