राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकतीच पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसीय संघ समन्वय बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यातील तीन प्रदेशांतील सदस्य प्रामुख्याने सहभागी झाले होते. त्यामध्ये सुकांतो मुझुमदार, सुवेंदू अधिकारी व दिलीप घोष हे प्रमुख भाजपा नेतेही उपस्थित होते. दोन दिवसांच्या या बैठकीचे ध्येय एकतेची भावना निर्माण करणे, एकत्रित येत प्रार्थना करणे, असे होते. या बैठकीमुळे पक्षाला अनेक फायदे होतील, असा भाजपाच्या सूत्रांचा विश्वास आहे. तसेच या कार्यक्रमामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंगालमध्ये आपले पाय घट्ट रोवण्यासाठी प्रयत्न करीत आहे का? त्यांच्या सामाजिक प्रभाव असलेल्या विचारसरणीचा फायदा भाजपाला २०२६ मध्ये होईल का?
सरसंघचालक मोहन भागवत सलग ११ दिवस बंगालमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे राज्यात संघाचा प्रभाव वाढल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर भागवत यांनी संघावर टीका करण्यापेक्षा संघाशी संवाद साधण्याने फायदे होतील, असे सांगितले. संघाचे शताब्दी वर्ष जवळ येत असतानाच त्या दृष्टीने अनेक कार्यक्रमांचे नियोजन होणे अपेक्षित आहे, ज्यामुळे बंगालमध्ये भाजपाच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकाने याबाबत बोलताना काही विशिष्ट लक्ष्य साध्य करण्यासाठी अशा बैठका महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.
एकता हा घटक
गटबाजी ही पश्चिम बंगालची एक मोठी पडती बाजू आहे. या दोन दिवसांच्या बैठकीत सुकांतो मुझुमदार व दिलीप घोष या नेत्यांनी चहापाण्याच्या भेटीचे काही क्षण शेअर केले. या अनुभवांचा उद्देशच पक्षात एकता वाढवणे हा आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना लॉकेट चॅटर्जी यांनी बैठकीत अनुभवलेल्या एकतेच्या सकारात्मक भावनांबद्दल सांगितले. संघ आणि भाजपा यांना एकत्रित कुटुंब म्हणून महत्त्व असल्याने, हे संबंध आणखी मजबूत करण्यावर प्रकाश टाकण्यात आला. भाजपा नेत्यांनी अंतर्गत मुद्द्यांवर यावेळी चर्चाही केली. त्यामुळे भाजपाच्या एकतेवर सकारात्मक परिणाम होईल, असे दिसून येते.
हिंदुत्वाचा मुद्दा
हिंदुत्वावर एकमत हा संघाच्या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा होता. बांग्लादेशातील परिस्थिती आणि जनगणना शास्त्रातील बदल हे घटक लक्षात घेता, विविध प्रदेशांतील नेत्यांनी याबाबतच्या रणनीतीवर विचारमंथन केले. ही चर्चा त्यांच्या वैचारिक मोहिमेला उपयुक्त अशी ठरली.
महाराष्ट्र, हरयाणा व दिल्ली येथील अहवाल त्या त्या प्रदेशांमधली संघाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतात. संघ राज्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही काही भाजपा नेत्यांना वाटत आहे.
त्याआधी २०११ मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या प्रकारे संघ कार्यरत होता, त्याच प्रकारे बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधीही होईल, असे बोलले जात आहे. शनिवार, १ मार्चपासून ते रविवार, २ मार्चपर्यंत ही बैठक सुरू होती. संघचालक मोहन भागवत यांच्या ११ दिवसीय बंगाल दौऱ्यादरम्यानच ही बैठक घेण्यात आली होती.