केरळच्या तिरुवनंतपुरममधील खासदार आणि काँग्रेसचे लोकप्रिय नेते शशी थरूर यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर काही काळ थरूर यांनी केरळचा दौरा केला. यामध्ये त्यांनी केरळच्या राजकारणात परतण्याचे संकेत दिले आहेत. एवढंच नाही तर विविध धर्मगुरु, सामाजिक घटक आणि त्यांच्या संघटना यांच्या भेटीगाठी, संवाद साधण्याचे कार्यक्रम त्यांनी सुरु केले आहेत. त्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये चुळबूळ वाढली असून काहींनी थेट तर काहींनी पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवत थरूर यांना दबक्या आवाजात विरोध करायला सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केरळमधील राजकीय परिस्थिती

केरळमध्ये अनेक वर्षांपासून मार्क्सवादी आणि मार्क्सवादाच्या विरोधी पक्षांचा पगडा राहिला आहे. सध्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचे पिनाराई विजयन यांनी पारंपरिक मार्क्सवादी मतांचे विभाजन करुन सत्ता काबीज केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मागच्या काही दशकात येथे बूथ स्तरावर जाऊन संघटनात्मक काम केल्यामुळे त्यांची पाळेमुळे मजबूत झाली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचा पाया कमजोर झालेला आहे.

काँग्रेसचे माजी नेते के. करुणाकरन यांनी पक्ष सोडल्यामुळे २००० साली काँग्रेसला मोठा झटका मिळाला. करुणाकरन यांच्या जाण्याने काँग्रेसकडील हिंदू मतांचा आकडा चांगलाच रोडावला. करुणाकरण आणि ए. के. अँटनी हे काँग्रेसमधील दोन मोठे नेते होते. पण या दोन नेत्यांमधील गटबाजीमुळे काँग्रेसला कधी पराभव तर दोन गट एकत्र आल्यानंतर विजय प्राप्त होत होता.

२०१६ मध्ये काँग्रेसचे आणखी एक नेते ओमन चांडी यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविल्यामुळे काँग्रेस संघटनेची स्थिती आणखी हलाखीची बनली. २०२१ मध्ये ज्या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस जिंकू शकली असती, तिथे केवळ संघटनेचा ढाँचा नसल्यामुळे पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. आता परिस्थिती अशी आहे की, २०२६ मध्ये पुन्हा एकदा एलडीएफ प्रणीत पिनराई यांचे सरकार येऊ शकते.

तर शशी थरूर यांची राजकीय कारकिर्द संपेल

शशी थरूर हे केरळमध्ये सक्रीय झाल्यामुळे प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांना त्यांचा धोका वाटत आहे. केरळमध्ये प्रभावशाली असलेल्या नायर समुदायाची संघटना नायर सर्विस सोसायटी (NSS) ने देखील शशी थरूर यांच्या केरळमधील कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र एनएसएसच्या कौतुकानंतर शशी थरूर यांच्यावर डाव्या पक्षातील नेते आणि वंचित संघटनांनी टीका केली आहे. एनएसएसने पाठिंबा दिल्यामुळे शशी थरूर यांची राजकीय कारकिर्द जवळपास संपुष्टात येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जातो. नायर समुदाय स्वतःला शासनकर्ती जमात म्हणून संबोधित करत आलेला आहे. या त्यांच्या भूमिकेला अनेकांचा विरोध आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर अजूनही प्रतिक्रिया का दिली नाही? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can shashi tharoor influence kerala politics why state congress worries kvg