Shashi Tharoor on Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या तिरुवनंतपुरम येथून चार वेळा लोकसभेवर निवडून जाणारे नेते शशी थरूर हे काँग्रेस पक्षश्रेष्ठीवर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. थरूर यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याची प्रशंसा केली होती. तसेच आता त्यांनी केरळमधील डाव्या पक्षाच्या धोरणांचे कौतुक केले आहे. काँग्रेसने आपल्या नीतीमध्ये बदल करत मतपेटीच्या बाहेरचा विचार करून नव्या मतदारांना आकर्षित केले पाहीजे, असा एक विचार त्यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेसला माझी गरज नसेल तर माझ्याकडे ‘पर्याय’ आहेत, असेही विधान शशी थरूर यांनी केले होते. या विधानानंतर सीपीआयएमचे नेते थॉमस इस्साक यांनी शशी थरूर यांना आवतण देत, केरळ थरूर यांना एकटे सोडणार नसल्याचे म्हटले आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वर्तमानम या मल्याळम भाषेतील साप्ताहिक पॉडकास्टमध्ये बोलताना थरूर यांनी काँग्रेस पक्षाबाबत रोखठोक मते मांडली आहेत. लिझ मॅथ्यू यांनी ही मुलाखत घेतली असून २६ फेब्रुवारी ती प्रदर्शित केली जाणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने एकामागोमाग अनेक राज्यात पराभव पाहिला. यामुळे आता पक्षाला नेहमीच्या मतपेटीच्या बाहेर असलेल्या मतदारांना आकर्षित करावे लागणार आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्या निवडणुकीचे उदाहरण दिले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

मला बिगरकाँग्रेसी मतदार मत देतात

शशी थरूर म्हणाले की, केरळमध्ये सलग तिसऱ्या टर्ममध्ये काँग्रेस विरोधात आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नेहमीच्या मतपेटीवर काँग्रेस सत्ता काबीज करू शकत नाही. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसकडे १९ टक्के मतदार आहेत, जे आपले पारंपरिक मतदार आहेत. पण आपल्याला सत्तेत यायचे असेल तर २६ ते २७ टक्के मतदानापर्यंत पोहोचावे लागेल. मागच्या निवडणुकीत ज्यांनी आपल्याला मत दिल नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल.

हे समजून सांगताना शशी थरूर यांनी स्वतःच्या निवडणुकीचे उदाहरण दिले. ते म्हणाले तिरुवनंतपुरममधील मतदारांना मी काँग्रेस पक्षाने दिलेल्या वचनांच्या पलीकडे जाऊन माझे विचार सांगतो. मी ज्यापद्धतीने बोलतो, ते लोकांना आवडते. त्यामुळेच जे काँग्रेसच्या विरोधात आहेत, तेदेखील मला मतदान करतात. हेच तर २०२६ साली आपल्याला करायचे आहे.

म्हणून पंतप्रधान मोदी, केरळ सरकारचे कौतुक केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पिनराई विजयन यांच्या लेफ्ट ड्रेमोक्रॅटिक फ्रंट सरकारचे कौतुक केल्याप्रकरणी शशी थरूर म्हणाले की, मी माझी मते रोखठोकपणे मांडत आलो आहे. मग ते देशाच्या किंवा केरळच्या विकासासाठी असो. माझ्यासारख्या राजकारण्याने राजकीय विचारांच्या बाबीतत लहान विचार करून चालणार नाही. त्यामुळेच मला जे चांगले वाटते, त्याबद्दल मी मोकळ्या मनाने बोलतो, मग काँग्रेस पक्ष त्या गोष्टीच्या विरोधात का असेना.

काँग्रेसची प्रतिक्रिया काय?

शशी थरूर यांच्या या पवित्र्यानंतर काँग्रेस पक्षातही खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे केरळमधील नेते के. एम. मुरलीधरन म्हणाले, “थरूर यांना काँग्रेस पक्षाबाबत काही अडचण असेल तर ती पक्षाअंतर्गतच सोडवली पाहीजे. पक्षाला सोडण्याची गरज नाही. संसदेत राष्ट्रीय विषयांवर बोलताना त्यांनी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे.” काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला म्हणाले की, मुलाखतीमध्ये ते काय बोलले यावरून वाद घालण्याची आवश्यकता नाही. मी केरळाचा अध्यक्ष असताना त्यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आमच्या पाठिंब्यामुळेच ते चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रीपद आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्यपदही दिले गेले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can shashi tharoor quit congress party after praises pm modi says i have options kvg