कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरातील श्री भगवद्गीता उद्यानातील एका फलकाचे विद्रुपीकरण करून त्यावर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी आहेत,’ अशी ग्राफिटी काढण्यात आल्याची घटना घडली. या प्रकारामुळे कॅनडामधील भारतीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर ब्रॅम्प्टन प्रशासनाने हा फलक उद्यानातून तत्काळ हटवला. तसेच त्या जागेवर नवा फलक लावण्यात आला. या घटनेनंतर ब्रॅम्प्टन शहर प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे. तसेच हा प्रकार म्हणजे लोकांच्या भावनांवर हल्ला आहे, असे मतही व्यक्त केले.
ब्रॅम्प्टन शहर प्रशासन काय म्हणाले?
घडलेल्या प्रकारानंतर ब्रॅम्प्टन शहर प्रशासनाने खेद व्यक्त केला. तसेच “उद्यानातील फलकाची नासधूस करण्याच्या कृत्यामुळे आमची खूप निराशा झाली आहे. हा एका समुदायाच्या भावनेवर हल्ला आहे. या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आलेली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून योग्य ती कारवाई केली जाईल,” असे ब्रॅम्प्टन प्रशासनाने ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे.
“अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत”
“ब्रॅम्प्टन शहरात अशा प्रकारची असहिष्णुता, भेदभाव यांच्याविरोधात आम्ही एकजुटीने उभे राहतो. आम्ही आमच्यातील विविधता, सर्वसमावेशकता, सर्वांप्रतीचा आदर या भावनांचा आदर करतो. द्वेष पसरवणाऱ्या अशा घटनांना खपवून घेतले जाणार नाही,” असेही ब्रॅम्प्टन शहर प्रशासनाने म्हटले आहे.
ब्रॅम्प्टन शहराच्या महापौरांनी दिली प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख असणारा फलक सर्वप्रथम शुक्रवारी (१४ जुलै) दिसला होता. या प्रकरणावर ब्रॅम्प्टन शहराचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी कॅनडातील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या घटनेनंतर त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच एखाद्या व्यक्तीच्या श्रद्धा, विश्वासावर हल्ला करणाऱ्या अशा कृत्यांना शहर कधीही खपवून घेणार नाही, असेही ब्राऊन म्हणाले.
या आधीही हिंदू मंदिराची तोडफोड
या आधीही कॅनडामध्ये अशाच प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर जानेवारी २०२३ मध्ये टोरोंटोमधील भारतीय दूतावासाने कॅनडातील संबंधित अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. या घटनेमुळे कॅनडातील भारतीय नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. तेव्हादेखील महापौर ब्राऊन यांनी या घटनेबाबत खेद व्यक्त केला होता. जुलै २०२२ पासून अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत.