नागपूर : पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी तसेच नाराजांकडून होणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी भाजपने यंदा इच्छुकांच्या मतदारसंघात बदल करण्याचा नवा प्रयोग नागपूर शहर व जिल्ह्यात केला आहे. काटोलसाठी इच्छुक आशीष देशमुख यांना सावनेरमध्ये तर दक्षिणमध्ये इच्छुक असलेले सुधाकर कोहळे यांना पश्चिममध्ये पाठवण्यात आले. निवडणुकीच्या राजकारणात अनेक खेळी खेळल्या जातात. काही विरोधी पक्षांना शह देण्यासाठी तर काही स्वपक्षातील विरोधकांना रोखण्यासाठी खेळल्या जातात. भाजप नेतृत्वाने नागपूरमध्ये खेळलेली उमेदवाराच्या सीमोल्लंघनाची ‘दक्षिण -पश्चिम’ खेळी ही त्यापैकीच एक व त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण या एकच खेळीने नेतृत्वाने पक्षातील हितशत्रूंना गारद करतानाच विरोधी पक्षातील मित्रालाही सांभाळून घेतले आहे.
कसे झाले सीमोल्लंघन?
काटोल ते सावनेर आणि दक्षिण ते पश्चिम असा हा मतदारसंघ बदल आहे. काटोलमधून लढण्यासाठी इच्छुक आशीष देशमुख सावनेरसाठी अर्ज भरत आहेत तर दक्षिणमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज सुधाकर कोहळे पश्चिममध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. आशीष देशमुख २०१४ मध्ये काटोलचे आमदार होते. मात्र त्यांनी भाजप सोडली. नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. २०१९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली. कालांतराने काँग्रेस सोडली. भाजपमध्ये गेले. ही सर्व उठाठेव त्यांची काटोलमधून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठीच होती. त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीही केली होती. सावनेर हा केदारांचा बालेकिल्ला असल्याने सावनेरच्या तुलनेत काटोल आपल्याला सोपे जाईल म्हणूनच आशीष देशमुख काटोलसाठी अधिक इच्छुक होते. पण, त्यांना सावनेरमध्ये उमेदवारी देण्यात आली. आता त्यांना काटोलची त्यांची यंत्रणा सावनेरमध्ये हलवावी लागेल. ही यंत्रणा काटोलमध्ये उमेदवार चरण ठाकूर यांच्यासाठी काम करेलच याबाबत खात्री नव्हती. या बदलामळे भाजपने सावनेर आणि काटोल हे दोन्ही मतदारसंघ सुरक्षित केले.
दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी यावेळी पुन्हा याच मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते. मतदारसंघात ते सक्रिय झाले होते. पण, तेथे पक्षाचाच विद्यमान आमदार असल्याने त्यांची उमेदवारी कापून कोहळे यांना उमेदवारी देणे पक्षाला शक्य नव्हते. त्यामुळे भाजपने आमदार मोहन मते यांनाच उमेदवारी दिली. पण, याच मतदारसंघात कोहळे व त्यांच्या समर्थकांकडून मते यांना त्रास होऊ नये याची काळजीही घेतली. कोहळेंना पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने त्यांचे सर्व समर्थक कार्यकर्ते आता पश्चिम नागपूरमध्ये प्रचारात सक्रिय होतील व मतेंचा त्रास कमी होईल, असे भाजपला वाटत आहे.
हेही वाचा – पुण्यातील दोन मतदारसंघांत महायुतीत बेबनाव
तीव्र प्रतिक्रिया
मतदारसंघ बदलाची कुणकुण लागताच पक्षात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, पश्चिम नागपूर मतदासंघातून इच्छुक असलेल्या संदीप जोशी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये असे प्रकार फार कमी घडतात. ही काँग्रेस संस्कृती मानली जाते. पण यंदा पश्चिमच्या निमित्ताने भाजपमध्येही त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसून आले. असाच प्रकार याच मतदारसंघाबाबत घडला. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडून उमेदवारीसाठी ‘हिदी भाषिक’चे कार्ड चालवण्यात आले. भाजपमध्ये भाषेच्या मुद्यावरून उमेदवारी मागणे हा नवा प्रकार यानिमित्ताने पाहायला मिळाला. एकूणच काय तर भाजपने केलेला उमेदवारांचा मतदारसंघ बदल ही वरवर शांततेने केलेली राजकीय खेळी वाटत असली तरी यानिमित्ताने पक्षातील खदखद पुढे आली आहे.