नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भारतास महान राष्ट्र बनवण्याचं एकच ध्येय होतं, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी ( २३ जानेवारी ) व्यक्त केलं. संघ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची विचारधारा एक नव्हती, यावरून टीका होत असताना भागवत यांनी हे वक्तव्य केलं. यावर आता सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मोहन भागवत?
“प्रत्येकानं नेताजींचे गुण आणि शिकवण आत्मसात करून देशास ‘विश्व गुरू’ बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करावे. आम्ही नेताजींच्या स्वातंत्र्य चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञ असल्यामुळेच नव्हे तर त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी त्यांचे स्मरण करतो. भारताला महान बनवण्याचे त्यांचे स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. ते साध्य करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. परिस्थिती आणि मार्ग भिन्न असू शकतात. परंतु, एकच ध्येय गाठायचे आहे,” असं मोहन भागवत यांनी म्हटलं.
हेही वाचा : काँग्रेसचे नेते सिद्धरामय्यांनी पंतप्रधान मोदींची केली हिटलरशी तुलना; म्हणाले, “काही दिवसच…”
“सुभाषचंद्र बोस पूर्वी काँग्रेसशी संबंधित होते. त्यांनी सत्याग्रह व आंदोलनाचा मार्ग अवलंबला. परंतु जेव्हा त्यांना हे लक्षात आले की हे पुरेसे नाही व स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्याची गरज आहे, तेव्हा त्यांनी तो मार्ग अवलंबला. मार्ग वेगवेगळे आहेत पण ध्येय एकच आहे. सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं अनुकरणीय आदर्श आपल्यासमोर आहेत. त्यांचे अन् आमचे ध्येय एकच आहे. नेताजींनी म्हटलं होते, की भारताने जगासाठी काम केलं पाहिजे आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल,” असं मोहन भागवंतांनी सांगितलं.
मोहन भागवंतांच्या वक्तव्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकुमार बोस म्हणाले, “नेताजी सर्वमावेशक आणि धर्मनिरपेक्ष असे एकमेव नेते होते. तुम्हाला एकाचवेळी सावरकर आणि नेताजींच्या विचारांवर चालता येणार नाही. ते एकाच पानावर असू शकत नाहीत. त्यामुळे कोणाच्या विचारांवर चालायचं हे मोहन भागवंतांनी स्पष्ट केलं पाहिजे,” असं चंद्रकुमार बोस यांनी सांगितलं.