आम आदमी पार्टी (आप) पक्षाचे नेते तथा गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ६ ऑगस्ट रोजी झालेल्या एका कार अपघातातील पुराव्यांशी त्यांनी छेडछाड केल्याचा आरोप केला जातोय. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी बनावट कारचालक (डमी ड्रायव्हर) सादर केल्याचे म्हटले जात आहे. या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या आरोपानंतर पालेकर यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यांना सध्या अंतरिम जामीन मिळाला असून त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर भाजपा प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे, असा दावा त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा प्रवेशासाठी माझ्यावर दबाव टाकला जातोय- पालेकर

पालेकर आम आदमी पार्टी (आप) पक्षात प्रवेश करण्यापूर्वी भाजपाचे सक्रिय नेते होते. या अपघाताप्रकरणी अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. “गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाजपात प्रवेश करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. मी भाजपा पक्षात प्रवेश न केल्यास भविष्यात वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल, असे सांगितले जात आहे. माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हा कट रचला जात आहे. एका वकिलाविरोधात अशा प्रकारे कट रचला जात असेल तर सामान्य लोकांची काय स्थिती असेल?” अशी टीका पालेकर यांनी केली. दरम्यान, पालेकर यांनी केलेले सर्व आरोप भाजपाने फेटाळले आहेत. राजकीय फायदा मिळावा यासाठी ते असा आरोप करत आहेत, असे भाजपाने म्हटले आहे.

आई-वडील माजी सरपंच

पालेकर हे महाविद्यालयीन काळापासून भाजपाशी संबंधित होते. त्यांच्या आई या उत्तर गोव्यातील मर्सेस या गावाच्या माजी सरपंच होत्या. तसेच २५ वर्षांपेक्षा अधिक काळ त्या भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्य होत्या. त्यांचे वडीलदेखील मर्सेस गावाचे माजी सरपंच होते. पालेकर यांच्या पत्नी वकील असून त्यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे.

“वैचारिक मतभेद निर्माण झाल्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय”

त्यांनी आप पक्षातील प्रवेशाबाबत तसेच भाजपा सोडण्याचा का निर्णय घेतला? याबाबत सविस्तर सांगितले आहे. “माझे या आधी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी (एमजीपी) पक्षाशी संबंध होते. त्यानंतर मी भाजपा पक्षात प्रवेश केला. गोव्यात भाजपाची पाळंमुळं रुजवण्यात माझ्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भाजपा पक्षात भ्रष्टाचार खूप वाढला आहे. भाजपाचे येथील नेतृत्व हे अकार्यक्षम आहे. कोणत्याही स्थितीत सत्ता काबीज करायची अशी भाजपाची मानसिकता झाली आहे. माझा भाजपाप्रती भ्रमनिरास झाला होता. आमच्यात वैचारिक मतभेदही निर्माण झाले होते. त्यामुळे मी आप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रामाणिक राजकारण करण्यासाठी मी हा निर्णय घेतला होता,” असे पालेकर यांनी सांगितले.

जातीचे राजकारण केले जात असल्याचा ‘आप’वर आरोप

आप पक्षात प्रवेश केल्यानंतर पालेकर यांनी २०२२ सालची गोव्याची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते. पालेकर हे भंडारी समाजातून येतात. हा समाज गोव्यात इतर मागास प्रवर्गात मोडतो. गोव्यात या समाजाचा मोठा प्रभाव आहे. आप पक्षाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पालेकर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर विरोधकांनी आप पक्षाकडून जातीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप केला होता. हे आरोप मात्र आप पक्षाने फेटाळून लावले होते.

“क्षमता असेल तर संधी मिळते”

“गोव्यात एक तृतीयांश भंडारी समाजाचे लोक आहेत. त्यांच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे, ही खरी बाब आहे. मात्र, जातीचे राजकारण करण्यासाठी पक्षाने माझी मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली नव्हती. गुणवत्तेच्या आधारावर ही निवड झाली होती. एखाद्या व्यक्तीमध्ये क्षमता असेल, ती व्यक्ती शिक्षित असेल, हुशार असेल; तर जातीचा, समाजाचा विचार न करता त्याला संधी दिली जाऊ शकते, असा संदेश माझ्या निवडीत होता,” असे पालेकर यांनी सांगितले.

आप पक्षाची गोव्यात काय स्थिती?

दरम्यान, गोव्यात आप पक्षाने २०१७ सालची विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत या पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. २०२० साली या पक्षाने बेनौलिममध्ये जिल्हा पंचायतीची जागा जिंकली. २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत आप पक्षाने दक्षिण गोव्यातून दोन जागांवर विजय मिळवला. २०१७ साली या पक्षाला ६.३ टक्के, तर २०२२ साली ६.८ टक्के मते मिळाली होती. या पक्षाकडे अजूनही गोव्यात बाहेरचा पक्ष म्हणूनच पाहिले जाते. ही प्रतिमा खोडून काढण्याचे आव्हान या पक्षासमोर आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car accident allegations of destroying evidence know who is aap goa president amit palekar prd