संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करण्याकरिता विविध प्रयोग केले जातात. धार्मिक वा जातीय आधारांवर मतांचे ध्रुवीकरण केले जाते तर कधी प्रादेशिक अस्मितेला फोडणी दिली जाते. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नियोजित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा ‘अहिंदा’चा प्रयोग यशस्वी झाला. असेच जातींचे विविध प्रयोग यापूर्वी करण्या आले आणि त्या त्या पक्षांना त्याचा फायदाही झाला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची मदार लिंगायत तर धर्मनिरपेक्ष जनता दलाची मदार ही वोक्कालिंग समाजाच्या मतदारांवर होती. काँग्रेस वा सिद्धरामय्या यांनी ‘अहिंदा’ भर दिला. सिद्धरामय्या यांचा हा प्रयोग यशस्वी तर झालाच पण मुख्यमंत्रीपदाच्या तीव्र स्पर्धेत त्यांनी या सूत्राच्या आधारेच बाजी मारली.

काय आहे अहिंदा?

अहिंदा याची कन्नडमधील फोड अशी. अल्पसंख्याकतारू (अल्पसंख्याक), हिंदूलीदावारू (मागासवर्ग) आणि दलितारू (दलित) . अल्पसंख्याक, दुर्बल घटक वा मार्गासवर्ग आणि दलित या मतांचे समीकरण साधण्याचा सिद्दरामय्या यांचा प्रयोग यशस्वी झाला. २०१३ ते २०१८ या काळात मुख्यमंत्रीपदी असताना सिद्दरामय्या यांनी या तीन घटकांकरिता विविध लोकोपयोगी योजना राबविल्या होत्या. लिंगायत आणि वोक्कालिंग मते भाजप आणि जनता दलात ‌विभागली जाणार हे गृहित धरून काँग्रेसने या तीन घटकांना जवळ केले. याचा काँग्रेसला फायदा झाला आणि पक्षाला सत्ता मिळाली.

‘खाम’चा प्रयोग गुजरातमध्ये यशस्वी

गुजरातमध्ये १९८५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांनी ‘खाम’चा प्रयोग राबविला होता. क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लीम यांची मोट बांधण्यात आली. तेव्हा गुजरातमधील प्रभावी पटेल समाज हा भाजपच्या जवळ गेला होता. त्याला शह देण्याकरिता सोळंकी यांनी ही खेळी केली. त्याचा फायदा असा झाला की, गुजरातमधील १८२ पैकी १४९ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. हा विक्रम गेल्या डिसेंबरमध्ये १५७ जागा जिंकून भाजपने मोडला.

‘माधव’ प्रयोग भाजपसाठी उपयोगी

राज्यात पारंपारिक राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेला मराठा समाज हा राज्याच्या स्थापनेपासून काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे होता. त्याला शह देण्याकरिता भाजपचे नेते कै. वसंतराव भागवत यांच्या पुढाकाराने माधवचा प्रयोग करण्यात आला. माधव म्हणून माळी, धनगर आणि वंजारी यांची मोट बांधणे. मराठा समाजाला शह देण्याकरिता हा प्रयोग राबविण्यात आला. जनसंघापासून भाजपच्या सुरुवातीच्या काळात हा पक्ष म्हणजे भटजी, शेठणींचा पक्ष अशी प्रतिमा तयार झाली होती. अन्य मार्गासवर्गीय समाजांना बरोबर घेण्याकरिता माधवचा प्रयोग राबविण्यात आला. यामुळे अन्य मागासवर्गीय भाजपबरोबर येण्यास मदत झाली. गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे आदी बहुजन समाजातील नेत्यांना संधी देण्यात आली. भाजपला कालांतराने माधवचा फायदाच झाला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caste based equations like akhanda kham are successful experiments to win the elections print politics news ysh
Show comments