लातूर : लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे हे विजयी झाल्यानंतर जिल्ह्यातील लिंगायत समाज विधानसभा निवडणुकीसाठी अतिशय सक्रिय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जातीची गणिते जिल्ह्यात बदलली आहेत. या बदलत्या गणिताचा लाभ विधानसभेला होईल, असा अंदाज प्रत्येक जण बांधतो आहे.
लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे हे माला जंगम समाजाचे आहेत व त्यांनी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली. त्यानंतर लिंगायत समाजामध्ये आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी उदगीर विधानसभा मतदारसंघ आरक्षित आहे. उर्वरित पाच मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार आहेत. यावेळी निलंगा विधानसभा मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेले संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. अरविंद भातंब्रे हे चांगली तयारी करत आहेत. औसा विधानसभा मतदारसंघात अभिमन्यू पवार यांनी माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांचा पराभव केला होता. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे हे त्यांच्या विरोधात निवडणुकीची तयारी करत आहेत.
हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात भाजपमधील वाद टोकाला
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्यावतीने निवडणुकीची तयारी करत आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्या मतदारसंघात अजितदादा गटाचे संजय बनसोडे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांची लढाई होईल. या मतदारसंघातही डॉ. शिवाजी काळगे यांच्याप्रमाणे माला जंगम समाजाचा नवा चेहरा लिंगायत समाज शोधत आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, असा प्रयत्न आहे.