यवतमाळ – जिल्ह्यात पारंपरिक प्रचारापलिकडे सर्वच उमेदवारांनी मतदारसंघातील जातीय समीकरणांवर जोर दिला आहे. कुणबी, आदिवासी, बंजारा, बौद्ध आणि ओबीसी समाजाची मते सर्वाधिक असलेल्या या जिल्ह्यात जातीय धृवीकरण कसे होते, यावर निवडणुकीतील यशापयश अवलंबून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकासकामे हा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा असला तरी निवडणूक अखेरच्या टप्प्यात जातीय समीकरणांवर घसरते, हा आजपर्यंतचा अनुभव असल्याने उमेदवारांनी त्या दृष्टीनेही मतदारसंघात बांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात बंजारा, कुणबी, आदिवासी, बौद्ध, मुस्लीम व ओबीसी हे महत्वाचे घटक असल्याने या समाजाची मते मिळविण्यासाठी उमदेवारांचा संघर्ष सुरू आहे. दिग्रस मतदारसंघ बंजाराबहुल आहे. या मतदारसंघात बंजारा समाजाची जवळपास ९० हजार मते आहेत. कुणबी मतांची संख्या ४० हजारांवर आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बंजारा, कुणबी समाजासोबतच बौद्ध, मुस्लीम, ओबीसी समाजाच्या एकगठ्ठा मतदानावरही त्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यासाठी मेळाव्यांवर आणि वैयक्तिक भेटींवर जोर दिला जात आहे.

यवतमाळ मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र येथे आजपर्यंत तब्बल नऊ वेळा अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार निवडून आला आहे. यावेळी रिंगणात असलेले महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही उमदेवारांच्या समाजाची मते कुणबी समाजाच्या मतांपेक्षा फार कमी आहे. प्रहार पक्षाकडून एकमेव कुणबी समाजाचा उमेदवार रिंगणात आहे. कुणबी समाजानंतर आदिवासी, मुस्लीम, बौद्ध, तेली, माळी समाजाची मते आहेत. यवतमाळात उत्तर भारतीयांची ३० हजार मतांची ‘वोट बँक’ भाजपसाठी कायमच पोषक ठरली आहे.

हेही वाचा >>> अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

अनुसूचति जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या उमरखेड मतदारसंघात याच प्रवर्गातील मतदारांचे प्राबल्य असले तरी येथे मराठा, कुणबी समाजाची साथ ज्या उमेदवाराला मिळते, त्याचा विजय सुकर होतो. २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला. त्यापूर्वी या मतदारसंघावर मराठा, कुणबी समाजाचे वर्चस्व होते. आर्णी मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे आदिवासी समाजाचे मतदार अधिक आहेत. मात्र यातही आंध, परधान, कोलाम, गोंड अशी वर्गवारी होत असल्याने उमेदवाराची दमछाक होते. यावेळी आर्णीमध्ये परधान विरूद्ध आंध असा सामना रंगणार आहे. मतदारसंघात बहुसंख्य असलेला कुणबी, मुस्लीम, बौद्ध समाज ज्याच्या बाजूने त्याचे पारडे जड असे चित्र असते. गेल्या दोन निवडणुकीत येथे भाजपने बाजी मारली. भाजपसोबत असेला आर्यवैश्य समाजही मतदारसंघात मोठ्या संख्येत आहेत.

हेही वाचा >>> Deoli Assembly Constituency : देवळीच्या जागेबाबत भाजप अधिक दक्ष

राळेगाव हा सुद्धा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातही आदिवासी समाजासोबत कुणबी समाजाचे वर्चस्व आहे. पुसद हा बंजाराबहुल मतदारसंघ आहे. मात्र येथेही आदिवासी, कुणबी, मराठा, बौद्ध, मुस्लीम व ओबीसी हा समाज निर्णायक ठरतो. यावेळी बंजारा विरूद्ध मराठा अशी प्रमुख लढत असल्याने येथील निवडणूक दोन्ही समाजासाठी वर्चस्वाची झाली आहे. वणी मतदारसंघात धनोजे कुणबी समाजाचे मतदार सर्वाधिक आहे. त्यामुळे या समाजाची मते ज्याच्याकडे वळतील, त्याला निवडणूक सोपी जाते. यापूर्वी या समाजानेही भाजपला साथ दिली. मात्र यावेळी समाजातील दोन प्रमुख उमेदवार भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळे येथेही जातीय वर्चस्वाची लढाई होत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caste equation will be decisive in yavatmal district for maharashtra assembly election 2024 print politics news zws