मुंबई : निवडणूक प्रचारात विरोधकांवर टीका करण्यासाठी आकर्षक घोषावाक्य बनवली जातात. या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या कवित्वाला धुमारे फुटले असून राज्यात अनेक नव्या घोषणा जन्माला आल्या आहेत. यामध्ये माढा आणि कोल्हापूर मतदारसंघ आघाडीवर आहेत.
कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलीक यांच्यात जंगी लढत आहे. ‘मान गादीला पण मत मोदीला’ अशी घोषणा शिवसेनेने पुढे आणली. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने ‘भीती गादीची म्हणून सभा मोदीची’ अशी प्रतिघोषणा बनवली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली मतदारसंघ शिवसेनेला मिळाला. तेथे काँग्रेसचे विशाला पाटील यांनी बंडखोरी केली असून ‘आमचं काय चुकलं’ असा प्रश्न करत ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी कैफीयत मांडली.
हेही वाचा : अखिलेश यादवांच्या मुलीने प्रचारसभांमध्ये वेधले लक्ष; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अदिती?
औरंगाबाद मतदारसंघात ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संदिपान भुमरे या शिवसैनिकांमध्ये लढत आहे. भुमरे यांच्या कुटुंबियांची ९ परमीट रुम असल्याची माहिती उघड झाली. त्याचे भांडवल करत ‘खासदार मंदिरवाला पाहिजे की दारुवाला ?’, अशी विचारणा खैरे गटाकडून केली जात आहे. नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावीत तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. गावीत यांच्याविरोधात यावेळी मोठी नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांचे कार्यकर्ते ‘मोदी तुझसे बैर नही, हिना तेरी खैर नही’ अशी घोषणा देताना दिसतात.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात टक्कर आहे. ‘माढा अन निंबाळकरांना पाडा’ तसेच ‘माझं बोट-तुतारीला व्हाेट’ या घोषणा येथे जोरात चालल्या आहेत. बारामतीत पवार नणंद- भावजय मधली लढत लक्षवेधी बनली आहे. सुप्रिया सुळे या घड्याळ ऐवजी प्रथमच तुतारी चिन्हावर लढत आहेत. ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ अशी घोषणा सुप्रिया जागोजागी देताना बघायला मिळाले.
हेही वाचा : जातीय हिंसाचारामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला; कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत?
शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले. मुंबई दक्षिण मतदारसंघात ठाकरे गटाचे कार्यकर्ते ‘निशाणी है मशाल, जीत होगी विशाल’ अशी घोषणा देत आहेत. सोलापुरचे भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महाराज प्रचारात दिसत नाही. त्यावरुन काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते ‘एक रुपयाचा कढीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता’ अशा घोषणा देताना दिसतात.