CM Jagan Mohan Reddy : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येच्या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. तसेच भास्कर रेड्डी यांचा मुलगा आणि कडप्पा लोकसभेचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांच्यावर देखील हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. ज्यांची हत्या झाली ते विवेकानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे लहान भाऊ आणि जगन मोहन यांचे काका होते. विवेकानंद रेड्डी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १५ मार्च २०१९ रोजी पुलिवेंदुला येथे त्यांची हत्या करण्यात आली. भास्कर रेड्डी आणि विवेकानंद रेड्डी एकमेकांचे चुलत भाऊ होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत वायएस अविनाश रेड्डी?

३८ वर्षीय वायएस रेड्डी हे आंध्र प्रदेशच्या कडप्पा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यांचे वडील भास्कर रेड्डी हे माजी मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचे चुलत भाऊ आहेत. मागच्या महिन्यात अविनाश रेड्डी यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. सीबीआयने केवळ एका साक्षीदाराच्या जबाबावरून माझ्यावर गंभीर आरोप केला, असा युक्तिवाद त्यांनी याचिकेत केला आहे. त्यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही.

भास्कर रेड्डी यांच्यावर आधीही झाला होता खूनाचा आरोप

२०१९ साली कडप्पा लोकसभा मतदारसंघात राजकीय स्पर्धेतून विवेकानंद रेड्डी यांची हत्या करण्यात आली. १५ मार्च २०१९ रोजी पुलिवेंदुला येथील आपल्या निवासस्थानी विवेकानंद रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. कडप्पामधील वायएसआर कुटुंबातील संघर्ष टोकाला जाऊन त्यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार विवेकानंद यांच्या शरीरावर सात वार केल्याचे निदर्शनास आले. भास्कर रेड्डी हे पुलिवेंदुला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. तेलगू देसम पार्टीचे (TDP) नेते पी. उमामहेश्वर रेड्डी यांची मे १९९८ रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी भास्कर रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. २००४ साली त्यांची निर्दोष मुक्तता झाली, तेव्हापासून पुलिवेंदुला जिल्ह्याच्या राजकारणात ते केंद्रस्थानी होते.

हे वाचा >> जगनमोहन रेड्डी देशातील सर्वांत श्रीमंत CM, तर यादीच्या तळाशी गोव्याचे प्रमोद सावंत; शिंदेंची एकूण संपत्ती

राजकीय संघर्षातून भावकीत रक्तपात

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, हे सर्व लोक एकाच कुटुंबातील असले तरी कडप्पा आणि पुलिवेंदुला मधील राजकीय वर्चस्वावरून विवेकानंद आणि अविनाश यांच्यात संघर्ष होत होता. कडप्पा येथून डी शिवा शंकर यांना विधानपरिषदेवर पाठविण्यासाठी भास्कर आणि अविनाश पिता-पुत्र प्रयत्नशील होते. मात्र जगन मोहन यांनी कडप्पा जिल्ह्यातून विवेकानंद यांना विधानपरिषदेचे तिकीट दिल्यामुळे ते दोघेही नाराज झाले. विवेकानंद यांचा निवडणुकीत पराभव व्हावा यासाठी बाप-लेकांनी आतोनात प्रयत्न केले, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विवेकानंद यांनी जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. डिसेंबर २०१८ साली म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी विवेकानंद यांनी कडप्पा लोकसभेसाठी त्यांची बहीण वायएस शर्मिला किंवा आई वायएस विजयालक्ष्मी यांना तिकीट द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री जगन मोहन यांच्याकडे केली.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार भास्कर आणि अविनाश या बाप-लेकांनी विवेकानंद यांना रस्त्यातून हटविण्याचा डाव आखला. यासाठी त्यांनी विवेकानंद यांच्यासाठी काम करणाऱ्या नोकरांना आपल्याबाजूने वळविले. यामध्ये वाय गंगी रेड्डी, आर. दस्तगीर आणि सुनील यादव यांचा समावेश आहे. विवेकानंद यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्याची माहिती खासदार अविनाश यांना देण्याची जबाबदारी नोकरांना देण्यात आली. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, विवेकानंद यांचा खून झाल्यानंतर बाप-लेकांनी मिळून सारे पुरावे नष्ट केले, तसेच आरोपींना आश्रय दिला.

सीबीआयने केलेल्या तपासानुसार विवेकानंद यांची हत्या झाल्यानंतर त्याठिकाणी सर्वात आधी खासदार अविनाश पोहोचले होते. विवेकानंद यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे अविनाश यांनी पोलिसांना सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवालात त्यांच्यावर वार झाल्याचे निष्पन्न झाले. विवेकानंद यांच्या शरीरावरील वार झाकण्यासाठी अविनाश आणि इतर आरोपींनी त्यांच्या जखमांवर पट्टी बांधून रुग्णवाहिकेतून पुलिवेंदुला येथील सरकारी रुग्णालयात नेले. अविनाश यांनी जाणूनबुजून गुन्ह्यातील पुरावे नष्ट केले, असा आरोप सीबीआयने केला.

आणखी वाचा >> तुरुंग, पदयात्रा ते मुख्यमंत्रिपद; असा आहे जगन मोहन रेड्डी यांचा प्रवास

२३ आणि २४ फेब्रुवारी रोजी तपासयंत्रणांनी पहिल्यांदा भास्कर आणि अविनाश रेड्डी यांची चौकशी केली. सीबीयाने या प्रकरणात २५० लोकांना साक्षीदार केले असून त्यांचे जबाब नोंदविले आहेत. विवेकानंद यांचा चालक दस्तगीर या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाला आहे. कडप्पा मधील कनिष्ठ न्यायालयाने कलम १६४ नुसार त्याचा जबाब नोंदविला असून त्यानुसार सीबीआयची कारवाई सुरू आहे. सीबीआयने २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिले आरोपपत्र दाखल केले आणि ३१ जानेवारी २०२२ रोजी पुरवणी आरोपपत्र जोडले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi arrest andhra cm ys jagan mohan reddy uncle in vivekandra reddy murder case kadapa mp avinash reddy set to feel the heat kvg
Show comments