मंगळवारी (४ जून) लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये एनडीए आघाडीला २९३; तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला ४०० पार जाण्याचा आत्मविश्वास होता; पण प्रत्यक्षात त्यांच्या आहे त्या जागाही कमी झाल्या आहेत. तर, दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ९९ जागा प्राप्त झाल्या आहेत. हा आकडा काँग्रेस पक्षासाठी सुखद आहे. कारण- २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फक्त ४४; तर २०१९ च्या निवडणुकीमध्ये ५२ जागा प्राप्त झाल्या होत्या. या निवडणुकीमध्ये जागांची ही संख्या जवळपास दुप्पट करण्यामध्ये काँग्रेसला यश आले आहे. एक्झिट पोल्समधील सगळे अंदाज खोटे ठरवीत इंडिया आघाडीने मुसंडी मारल्यामुळे भाजपाचे स्वबळावरील बहुमत गेले आहे. त्यामुळे भाजपाला सत्तास्थापनेसाठी आता आपल्या सहकारी पक्षांच्या आधारावर अवलंबून राहावे लागणार आहे. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला आहे; मात्र दुसरीकडे हिमाचल प्रदेश व मध्य प्रदेशमधील सर्वच्या सर्व जागा जिंकण्यात भाजपाला यश आले आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघात अभिनेत्री कंगना रणौतला भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती. तिने या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला आहे. फक्त कंगनाच नव्हे, तर इतरही अनेक सेलिब्रिटी लोकभा निवडणुकीच्या रिंगणात होते. हेमा मालिनी, मनोज तिवारी, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या सेलिब्रिटींचा निकाल काय लागला? यावर एक नजर टाकू या…

हेही वाचा : देशात सर्वाधिक काळ पदावर असणारे पंतप्रधान कोणते?

BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
mixers juicers and tabs distribution to bandra women
‘खनिज क्षेत्र’ निधीतून मिक्सर, टॅबचे वाटप; खाणकाम उद्योगाने बाधित झालेल्यांचा निधी इतरत्र वळवण्यास विरोध
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Lahori bar nagpur, nagpur hit and run case,
नागपूर ‘हिट अ‍ॅण्ड रन’मुळे चर्चेत आलेल्या लाहोरी बारवर वरदहस्त कुणाचा?

कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत आधीपासूनच नरेंद्र मोदींची चाहती राहिली आहे. त्यामुळे तिला मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यावर फारसे कुणाला आश्चर्य वाटले नाही. या निवडणुकीमध्ये तिच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान होते. मात्र, कंगनाने या निवडणुकीमध्ये ५,३७,०२२ मते मिळवून ७४,७५५ मताधिक्याने विजय प्राप्त केला. काँग्रेसचे उमदेवार विक्रमादित्य सिंह हे रामपूर संस्थानाच्या राजघराण्याचे वंशज आणि हिमाचलचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या विदर्भ सिंह यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचे पारडेही तसे जड मानले जात होते. मात्र, कंगनाने नरेंद्र मोदींच्या नावावर प्रचार करून या निवडणुकीत यश मिळवले. या विजयानंतर कंगनाने म्हटले आहे, “या समर्थन, प्रेम व विश्वासासाठी मंडीतील सर्व लोकांचे मनापासून आभार. हा तुम्हा सर्वांचा विजय आहे, हा पंतप्रधान मोदीजी व भाजपवरील विश्वासाचा विजय आहे, हा सनातनचा विजय आहे, हा मंडीच्या सन्मानाचा विजय आहे.”

हेमा मालिनी

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सलग तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाच्या तिकिटावर लढणाऱ्या हेमा मालिनी यांना ५,१०,०६४ मते मिळाली आहेत. त्यांना काँग्रेसचे उमेदवार मुकेश धनगर यांचे आव्हान होते. मात्र, त्यांना २,९३,४०७ मते मिळाली. तिसऱ्यांदा विजय प्राप्त केल्यानंतर हेमा मालिनी यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “मी खूपच आनंदी आहे. मला तिसऱ्यांदा लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मतदारसंघातील जी कामे अपूर्ण राहिली होती, ती सर्व पूर्णत्वास नेली जातील. मी एनडीएतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानते.”

सुरेश गोपी

सुरेश गोपी हे दाक्षिणात्य अभिनेते राहिले आहेत. त्यांनीदेखील केरळमध्ये भाजपाला पहिला विजय मिळवून दिला आहे. आजवर डाव्यांचा प्रभाव असलेल्या केरळसारख्या राज्यामध्ये भाजपाला कधीच आपले खाते उघडता आले नव्हते. मात्र, सुरेश गोपी यांच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन भाजपाला केरळमध्ये शिरकाव करता आला आहे. केरळमधील त्रिस्सुर मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या सुरेश गोपी यांना ४,१२,३३८ मते मिळाली. त्यांनी माकपचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा ७४,६८६ मतांनी पराभव केला आहे.

मनोज तिवारी

भोजपुरी सिनेमा स्टार मनोज कुमार तिवारी हे मूळचे बिहारचे असले तरी ते भाजपाकडून ईशान्य दिल्लीमधून निवडणूक लढवितात. त्यांनी तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळविला असून, यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांचा १.३८ लाख मताधिक्याने पराभव केला आहे. मनोज कुमार तिवारी यांना या निवडणुकीमध्ये ८,२४,४५१ मते मिळाली.

शत्रुघ्न सिन्हा

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघात त्यांनी भाजपाचे उमेदवार एस. एस. अहलुवालिया यांचा ५९ हजार ५६४ मतांनी पराभव केला. शत्रुघ्न सिन्हा यांना ६,०५,६४५ मते मिळाली; तर अहलुवालिया यांना ५,४६,०८१ मते मिळाली.

हेही वाचा : वायनाड की रायबरेली? कोणताही एक मतदारसंघ सोडणे राहुल गांधींसाठी कठीण का आहे?

रवी किशन

रवी किशन यांनी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीमध्ये त्यांना ५,८५,८३४ मते मिळाली. त्यांनी समाजवादी पार्टीच्या उमेदवार काजल निशाद यांचा एक लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला. काजल निशाद यादेखील भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रवी किशन यांनी गोरखपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे उमेदवार रामभुआल निषाद यांचा तीन लाख मताधिक्याने पराभव केला होता. रवी किशन यांनी २०१४ साली काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१४ साली जौनपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर ते पराभूत झाले होते. २०१७ साली त्यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

अरुण गोविल

सुप्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी भाजपाकडून मेरठ मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये त्यांनी ५,४६,४६९ मते घेऊन विजय मिळविला. त्यांना समाजवादी पार्टीच्या उमेदवार सुनीता यादव यांचे आव्हान होते. अरुण गोविल १० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

युसूफ पठाण

भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. त्याला तृणमूल काँग्रेस पार्टीने बहरामपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी विद्यमान खासदार होते. त्यांचा पराभव करण्यात युसूफ पठाणला यश आले आहे. युसूफ पठाणने ५,२४,५१६ मते मिळवली आहेत; तर अधीर रंजन चौधरी यांना ४,३९,४९४ मते मिळाली आहेत.