महेश सरलष्कर

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) यांच्यासह भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

‘’एनडीए’’च्या सहमतीच्या उमेदवाराला विजयी होण्यात फारशी अडचणी येणार नाही हे जरी खरे असले तरी, भाजपला नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांची मदत लागेल. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जनता दल (सं) ‘’एनडीए’’मध्ये असला तरी, नितीश कुमार यांची कोंडी करण्यासाठी भाजपकडून सातत्याने कुरापती काढल्या जात आहेत. त्याचा राष्ट्रपती पदाच्या मतदानावेळी फटका बसू नये याची दक्षता भाजपला घ्यावी लागणार आहे. कुंपणावर बसलेले दोन पक्ष आणि दूर जात असलेला मित्रपक्ष यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या महिन्यामध्ये केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मतभेद मिटवण्यासाठी नितीशकुमार यांच्याकडे पाठवले होते. या दोघांमधील चर्चेची माहिती प्रदेश भाजपलाही देण्यात आली नव्हती. नवीन पटनायक यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस, तर जगनमोहन रेड्डी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतमूल्ये असून ‘’एनडीए’’च्या उमेदवाराला विजयी होण्यासाठी ५ लाख ४३ हजार २१६ मतमूल्यांची गरज आहे. ‘’एनडीए’’कडे भाजप (४ लाख ५९ हजार ४१४), जनता दल (सं) (२२ हजार ४८५) आणि अण्णाद्रमूक (१५ हजार ८१६) मतमूल्ये आहेत. म्हणजे ‘’एनडीए’’कडे एकूण ५ लाख २६ हजार ४२० मतमूल्ये आहेत. विजयासाठी ‘’एनडीए’’ला आणखी १६ हजार ७९६ मतमूल्यांची गरज आहे. बिजू जनता दलाकडे ३१ हजार ६८६ तर, वायएसआर काँग्रेसकडे ४३ हजार ४५० मतमूल्ये आहेत. या दोन प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपप्रणित ‘’एनडीए’’चा उमेदवार विजयी होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या विजयाची फारशी चिंता नसली तरी, विरोधकांच्या मतभेदामध्ये अधिक फाटाफूट करण्याचे उद्दिष्ट ठेवून भाजप उमेदवाराची निवड करू शकतो. भाजप नेहमीच धक्कातंत्राचा वापर करत असल्याने यावेळीही चर्चेत नसलेली पण, विरोधकांना अचंबित करणारी एखादी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरवली जाण्याची शक्यता आहे. सध्या केरळचे राज्यपाल आरिफ महम्मद खान यांचे नाव चर्चेत आहे. केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेली नाही. उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही त्यांना डावलले गेले. मात्र, नुपूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्तार नक्वी यांचा कदाचित उपराष्ट्रपती पदासाठी विचार केला जाऊ शकतो. नक्वी यांना उपराष्ट्रपती पद दिले तर, राष्ट्रपती पदासाठी मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उतरवला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महिला-आदिवासी म्हणून द्रौपदी मुरमू, अनुसूया उईके याशिवाय, अनुसूचित जातींमधील प्रमुख चेहरा असलेले माजी केंद्रीयमंत्री व कर्नाटकचे विद्यमान राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा विचार केला जाऊ शकतो. तसेच, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आनंदीबाई पटेल यांच्याही नावाची चर्चा होत आहे.

भाजपच्या उमेदवाराच्या निवडीवर विरोधकांचा उमेदवार ठरणार आहे. गेल्यावेळी अनुसूचित जातीतील रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांनी अनुसूचित जातीतील काँग्रेसच्या नेत्या मीरा कुमार यांना उमेदवारी दिली गेली होती. भाजपचे कट्टर विरोध असलेले डावे पक्ष, तामीळनाडूतील द्रमूक, आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस यांना डिवचण्यासाठी भाजपकडून महिला, अनुसूचित जाती-जमाती वा दक्षिणेतील एखादा उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. द्रमूक आणि तृणमूल काँग्रेसच्या आपापल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशामुळे त्यांचे विरोधकांमधील राजकीय वजन वाढलेले आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसला एकतर्फी उमेदवार निश्चित करता येणार नाही. हे लक्षात घेऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमलू काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, माकपचे महासचिव सीताराम येचुरी तसेच, द्रमूकचे प्रमुख स्टॅलीन यांच्याशी संपर्क साधला आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते व सोनियांचे विश्वासू मल्लिकार्जुन खरगे विरोधकांशी समन्वय साधणार आहेत.

‘’यूपीए’’कडे एकूण २ लाख ५९ हजार ८९२ मतमूल्ये आहेत. त्यामध्ये काँग्रेस (१ लाख ४५ हजार ६०८), राष्ट्रवादी काँग्रेस (१५ हजार ७५०), द्रमूक (४७ हजार ३२), शिवसेना (२५ हजार २००) व राष्ट्रीय जनता दल (१६ हजार ६४८) यांचा समावेश आहे. तृणमलू काँग्रेसकडे ५८ हजार ११८, डाव्या पक्षांकडे २४ हजार ९०३ तर, समाजवादी पक्षाकडे २८ हजार ६८८ मतमूल्य आहे. म्हणजे विरोधकांकडे एकूण ३ लाख ७१ हजार ६०१ मतमूल्ये आहेत. यामध्ये एमआयएम, मुस्लिम लिग आदी छोट्या पक्षांचीही समावेश होऊ शकते. ‘’आप’’, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय तेलंगण समिती आदी पक्षांचा काँग्रेसला तसेच भाजपलाही विरोध असल्याने ते कोणाच्या पारड्यात मते टाकतात हेही महत्त्वाचे असेल.

Story img Loader