नवी दिल्ली : राज्यातील भाजपच्या सुमारे ६० उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री वा गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भाजपच्या बहुसंख्य उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते.

महायुतीमध्ये भाजप १६० जागा लढवणार असून उर्वरित जागा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला दिल्या जातील. महायुतीच्या जागावाटपाची घोषणा झाली नसली तरी सोमवारी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयामध्ये राज्यात भाजप लढवणार असलेल्या जागांवर व संभाव्य उमेदवारांवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

भाजपने २०१९मध्ये जिंकलेल्या मतदारसंघांबाबत चर्चा पूर्ण झाली असून संभाव्य उमेदवारही निश्चित झाले आहेत. मात्र, बुधवारी होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

हेही वाचा >>>निवडणुकांच्या तोंडावर ‘लाडक्या बहिणींना’ सरकारची भावनिक साद

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली जाते. त्यानुसार सोमवारी भाजपच्या प्रदेश नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये विभागवार चर्चा करण्यात आली. तसेच, सामजिक व जातीय गणितांबाबत मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आल्याचे समजते. बुधवारी होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी पुन्हा एकदा राज्यातील नेत्यांबरोबर केंद्रीय नेत्यांची सर्व विषयांवर चर्चा होणार असल्याचे समजते.

या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, मुरलीधर मोहोळ, विनोद तावडे, आशीष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय नेते अमित शहा, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, जे. पी. नड्डा, पीयूष गोयल, बी. एल. संतोष उपस्थित होते.

प्राधान्य कोणाला?

भाजपच्या पहिल्या यादीमध्ये विद्यामान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, लोकसभा निवडणूक लढवलेल्या नेत्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाणार नाही. पाच वर्षांत अपेक्षित कामगिरी न केलेल्या काही विद्यामान आमदारांना संधी नाकारली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

महायुतीतील तीनही घटक पक्ष एकत्रितपणे विधानसभेची निवडणूक लढवतील. आम्ही २८८ मतदारसंघांमध्ये समन्वय समित्याही स्थापन केल्या आहेत. आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये एकमेकांना साह्य करू. अजित पवार यांच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी भाजप पूर्ण ताकद उभी करेल. अशीच मदत शिंदे व अजित पवार यांचा गट भाजपलाही करेल. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करणे हेच एकमेव लक्ष्य असेल.-चंद्रशेखर बावनकुळेभाजप प्रदेशाध्यक्ष