महेश सरलष्कर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासू केंद्रीयमंत्र्यांपैकी मानले जाणारे केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री पीयुष गोयल तसेच, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना (ओएसडी) अचानक डच्चू देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने सोमवारी दोन वेगवेगळ्या आदेशाद्वारे ओएसडी म्हणून नेमलेल्या दोन्ही खासगी व्यक्तींचा कार्यकाळ संपुष्टात आणला आहे. या ‘कारवाई’मागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
केंद्रीयमंत्री पीयुष गोयल यांचे ओएसडी अनुज गुप्ता यांची सेवा ७ मार्च २०२३ पासून तर, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या ओएसडी देवंशी विरेन शहा यांची सेवा ३१ जानेवारी २०२३ पासून खंडित केली जात असल्याचे आदेश ११ एप्रिल रोजी कार्मिक व प्रशिक्षण विभागाने काढले आहेत. ओएसडीची नियुक्ती जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी केली जाते पण, संबधित मंत्र्याने त्याआधीच मंत्रीपदाचा भार सोडल्यास ओडीसीची सेवाही आपोआप संपुष्टात येते. मंत्र्यांचे ओएसडी म्हणून प्रशासकीय सेवेतून आलेल्या उपसचिव ते सचिवपदापर्यंतच्या अधिकाऱ्यांची वा सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. मात्र, मंत्र्याच्या विश्वासातील एखाद्या खासगी व्यक्तीचीही ओएसडी म्हणून नियुक्ती करता येऊ शकते. या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीची मान्यता घ्यावी लागते.
२०१९ पासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीमध्ये पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री हे दोनच सदस्य आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कर्मचारी वर्गाला हिरवा कंदिल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच दोघे देतात. मोदी-शहांनी अनुज गुप्ता व देवंशी शहा यांच्या ओडीसी नियुक्तीला मान्यता दिली होती. मोदींच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसांमध्ये काही मंत्र्यांच्या ओडीसींना डच्चू देऊन त्यांची अन्य विभागांमध्ये नियुक्ती केली होती. यावेळी कार्यकाळ संपण्यासाठी वर्षभराचा काळ असतानाही गुप्ता व शहा यांची सेवा पूर्वलक्ष्यी प्रभावाने खंडित करण्याचा आदेश भुवया उंचावणारा ठरला आहे.
केंद्रीयमंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत २०१६ पासून कार्यरत असलेल्या अनुज गुप्ता यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २०२१ मध्ये संपुष्टात आला होता. ओडीसींच्या नियुक्तीला पाच वर्षांची मर्यादा असूनही गुप्ता यांना मुदतवाढ देण्यात आली होती. रेल्वे मंत्रालयानंतर गोयल यांच्याकडे उद्योग व वाणिज्य मंत्रालय, वस्त्रोद्योग तसेच ग्राहक संरक्षण व सार्वजनिक वितरण मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली. सर्व मंत्रालयांमध्ये गुप्ता हे गोयल यांचे ओएसडी होते.
हेही वाचा… पुण्याच्या रिंगणात आम आदमी पार्टीही पोटनिवडणूक लढण्याची तयारी
केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर २०१९ मध्ये देवंशी शहा यांची पाच वर्षांसाठी ओएसडी म्हणून नियुक्ती केली गेली. इराणी यांनी २०२१ मध्ये महिला व बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहा यांची या मंत्रालयातही इराणींच्या ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचा एकूण पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्याआधीच शहांना डच्चू देण्यात आला आहे.