लक्ष्मण राऊत
अलीकडेच भाजपने औरंगाबाद येथे काढलेल्या जलआक्रोश मोर्चाच्या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रस्त्यावर उतरून राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीस वाट मोकळी करून देण्यासाठी केलेल्या धावपळीची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यावरून दानवे यांच्यावर टीकाही झाली. परंतु असे असले तरी दानवे यांच्या मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांना त्यामध्ये काही वावगे वाटले नाही. कारण दानवे यांच्या स्वभावातील हा गुण त्यांना चांगलाच ठाऊक आहे, हे असे वागण्याच्या भरपूर आठवणी त्यांच्याजवळ आहेत. त्यामुळेच जालना मतदारसंघात रावसाहेबांची बोली आणि जायकवाडीची खोली यावरून सतत चर्चा सुरू आहेत.
दोन वेळेस विधानसभेवर आणि पाच वेळेस लोकसभेवर सलग निवडून येणाऱ्या दानवेंच्या भाषणशैलीचा आणि वागण्याचा अनुभव खऱ्या अर्थाने ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावरच राज्यास आला. त्यापूर्वीपासून प्रामुख्याने भोकरदन, जाफराबाद, बदनापूर आणि जालना तालुक्यांतील जनतेस हा अनुभव आहे. दानवेंच्या वागण्या-बोलण्याचे न संपणारे किस्से आहेत. मागे एकदा ‘पथकर हटाव’ मागणीसाठी जालना शहरातील टोलनाक्यावर दानवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचे जाहीर झाले. टोलनाक्यावर दानवे स्वत: पोहोचू नयेत यासाठी पोलिसांनी दूरपर्यंत नाकेबंदी केली. परंतु दानवे मात्र एका पायी दिंडीसोबत डोक्यावर पगडी, गळ्यात कवड्यांची माळ आणि हातात परडी घेऊन टोलनाक्यापर्यंत पोहोचले होते. त्यांचे वेशांतर एवढे बेमालूम झाले होते की, आरशात पाहिले असते तर त्यांनी स्वत:स स्वत:ला ओळखले नसते! एकदा रस्त्याने जाताना घोडा दिसला की ते गाडी सोडून घोड्यावर स्वार झाले. पुढे दानवेंचा घोडा आणि पाठीमागे धावणारे अंगरक्षक असे हे चित्र होते! रस्त्याने जाताना गाडी थांबवून शेतकऱ्यांशी बोलतील आणि त्याच्या बैलाचे दातही मोजतील, असे दानवे जनतेने पाहिले आहेत.
आपल्या भोकरदनमधील निवासस्थानी व्यायाम करणारे, चुलीवर भाकरी करणारे, धूलिवंदनाच्या दिवशी रंग खेळणारे, पारावर ग्रामस्थांशी गप्पांचा फड जमविणारे दानवे अनेकांनी पाहिले आहेत. त्यांच्या या सर्व कला दूरचित्रवाणी आणि समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या आहेत. त्यांच्या कलांचे सर्व स्तरांतून कौतुकच होते तर कधी त्यांना याबद्दल विरोधकांच्या टीकेचे धनीही व्हावे लागते! परंतु काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हातात तुणतुणे धरणाऱ्या दानवेंना त्याची फिकीर वाटत नाही. मी साधा राहतो, जनतेच्या भाषेत बोलतो, लोकांत मिसळतो आणि जनतेला ते आवडते, अशी या संदर्भातील भूमिका त्यांनी अनेकदा स्पष्ट केलेली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर जालना जिल्ह्याबाहेर त्यांच्या वक्तृत्व शैलीची खऱ्याअर्थाने ओळख झाली. परदेश दौऱ्यात आलेले भाषेचे अनुभव, ठरवून दिलेले कार्यक्रम राबविताना असलेला पक्षश्रेष्ठींचा धाक इत्यादी संदर्भात त्यांनी सांगितलेले किस्से तर सर्वश्रुत आहेत. ग्रामीण जनतेला पटणारी उदाहरणे देऊन सभा काबीज करण्याचे तंत्र दानवे यांना अवगत असले तरी त्या नादात एखादा शब्द इकडे-तिकडे जातो आणि मग विरोधकांकडून त्यांच्यावर टीका सुरू होते. तूर खरेदीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या बैठकीत काढलेले उद्गार यापैकी एक! परंतु त्याबाबतही नंतर त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छता अभियानाच्या बैठकीत त्यांनी एका सरपंचास उभे केले आणि उद्या तुझे ट्रॅक्टर घेऊन ये असे फर्मावले. त्यानंतर शेजारचा कार्यकर्ता म्हणाले, दादा, त्याच्याजवळ ट्रॅक्टर नाही. त्यावर प्रतिक्रिया देणार नाहीत ते दानवे कसले? सरपंचाला उद्देशून ते म्हणाले, ‘दहा वर्षे सरपंच राहूनही ट्रॅक्टर घेऊ शकला नाहीस, बस खाली! ’ हे वाक्य दानवे यांनी अशा आविर्भावात उच्चारले की, संपूर्ण बैठक हास्यकल्लोळात बुडाली. पहिल्यांदा राज्यमंत्री होण्यापूर्वी अमित शहा यांनी चहा घेण्यासाठी गुजरात भवनमध्ये बोलावले आणि शपथ घेण्यासाठी तयार राहा असे सांगितल्याच्या दरम्यान आपली काय अवस्था झाली होती, हा किस्सा तर त्यांनी अनेकदा रंगवून सांगितलेला आहे.
पूर्वी एकदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी आपल्यापेक्षा डेन्मार्क देश दुग्ध व्यवसायात कसा प्रगत आहे हे सांगितले होते. तिथला गुराखी सुटाबुटात असतो. यंत्राने गायी-म्हशी धुतल्या जातात आणि यंत्राने दूध काढले जाते. दूध एका यंत्रात गेले की, दुसऱ्या बाजूने दही, ताक, श्रीखंड इत्यादी उपपदार्थ बाहेर येतात असे दानवे यांनी १५-२० मिनिटे रंगवून सांगितले होते. एका निवडणुकीच्या प्रचारात दानवे म्हणाले होते,की गाडीतून प्रवास करताना रस्त्याच्या बाजूला काही गाड्या उभ्या होत्या आणि शेतात गर्दी झाली होती. मी लांबून पाहिले तर तेथे सोनिया गांधी होत्या. शेतात हिरव्या आणि वाळलेल्या लाल मिरचीचे ढीग होते. सोनिया गांधींनी शेतकऱ्याला भाव विचारल्यावर लाल मिरचीचा भाव अधिक असल्याचे त्यांना कळाले. त्यावर सोनिया गांधी शेतकऱ्याला म्हणाल्या, तुम हरी मिर्ची क्यूं उगाते, लाल मिर्ची उगाते जाव! त्यावर दानवे म्हणतात,की हिरवी मिर्ची अगोदर येते आणि तीच पुढे लाल होते, हे ज्यांना माहीत नाही, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न काय माहिती असणार? वरील दोन्हीही उदाहरणांत ऐकणाऱ्या श्रोत्यांना आपण हे काल्पनिक ऐकत आहोत असे कळत नसते असे नव्हे, त्यामधून मिळणाऱ्या आनंदास मुकायची त्यांची इच्छा नसते! त्यांच्या समर्थकांना खास भाषाशैलीतील विनोदाची आणि किश्श्यांची अपेक्षा असते. असा काही अनुभव आला नाही तर त्यांना करमत नाही. ते म्हणतात, आज भाषण काही रंगले नाही!
एका कार्यक्रमात त्यांनी खासदाराचे पद एखाद्या वळूसारखे असते असे उदाहरण दिले होते. खासदारांना खूप कामे असतात आणि लोक गावातील वळूप्रमाणे त्याला कुठेही घेऊन जातात, असा त्यांच्या म्हणण्याचा आशय होता. केंद्रात राज्यमंत्री झाल्यावर मतदारसंघात आपला जीव कसा राहील हे सांगताना राजवैभव मिळूनही जमिनीत लपवून ठेवलेल्या कवडीत जीव गुंतलेल्या भिकाऱ्याचे उदाहरण त्यांनी दिले होते. साडेतीन दशकांच्या राजकारणातील भाषणात त्यांनी अशी शेकडो उदाहरणे दिली आहेत. अघळ-पघळ, ग्रामीण जनतेशी थेट नाळ जोडणारी आणि श्रोत्यांचा प्रतिसाद पाहून कधी-कधी एखादा आक्षेपार्ह शब्द निघणारी दानवेंची शब्दशैली आहे. गेली साडेतीन दशके सातत्याने राजकारणात यश मिळविणाऱ्या दानवे यांच्या समर्थकांना मात्र ‘दादांची बोली आणि जायकवाडीची खोली’ ही मराठवाड्याची ओळख असल्याचे वाटत असते. हे दानवेही स्वत: सांगतात!
दोनदा आमदार आणि पाचदा खासदार अशा सलग सात निवडणुका जिंकताना दानवे यांनी आपण त्यामध्ये वाकबगार असल्याचे दाखवून दिले आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय, सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला आहे. पक्षातील जिल्हाअंतर्गत मतभेद, विरोधकांचे आरोप, टीका, पक्षाकडून राज्यपातळीवर नेतृत्व मिळण्यास झालेला विलंब इत्यादींचा अनुभव घेत दानवे येथपर्यंत पोहोचले आहेत. आजही ते राजकीय कसरती रस्त्यावर करतात.