भाजपाच्या चंदिगड मतदारसंघाच्या खासदार किरण खेर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. उद्योजक चैतन्य अग्रवाल यांनी खेर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. खेर यांच्यापासून मला तसेच माझ्या कुटुंबीयांना धोका आहे, असा दावा अग्रवाल यांनी केला आहे. त्यानंतर आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अग्रवाल यांना एका आठवड्यासाठी पोलिस संरक्षण देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, खेर या पहिल्यांदाच अशा प्रकारे चर्चेत आलेल्या नाहीत. याआधीही वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांची देशभरात चर्चा झाली होती.
नेमके प्रकरण काय?
किरण खेर यांनी मला गुंतवणुकीसाठी आठ कोटी रुपये दिले होते. नफा मिळाल्यानंतर मी ही रक्कम त्यांना परत करणार होतो, असे अग्रवाल यांनी सांगितले आहे. तसेच अग्रवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार खेर यांनी दिलेल्या पैशांची अग्रवाल यांनी योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक केली होती. तसेच ऑगस्ट महिन्यात त्यांनी खेर यांना दोन कोटी रुपये परत केले होते. नोव्हेंबर महिन्यात बाजारात चढउतार झाल्यामुळे उर्वरित रक्कम देण्यासाठी त्यांनी खेर यांच्याकडे वेळ मागितला होता. मात्र, खेर यांनी अग्रवाल यांना धमकावण्यास सुरुवात केली. उर्वरित रक्कम व्याजासहित त्वरित परत करावी, असे खेर अग्रवाल यांना सांगत होत्या. तसे अग्रवाल यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे.
खेर यांना मतदारसंघातच विरोध
आगामी काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. असे असतानाच हे प्रकरण समोर आल्यामुळे राजकीय दृष्टीने खेर अडचणीत येऊ शकतात. २०१४ साली भाजपाने खेर यांना चंदिगड मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली होती. त्यावेळी खेर यांना चांगलाच विरोध झाला होता. चंदिगडमध्ये आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. असे असतानाच आता हे प्रकरण समोर आल्यामुळे खेर यांना स्थानिक पातळीवरही विरोध होऊ शकतो.
“अशा घटनांमुळे पक्षाची प्रतीमा मलीन होते”
यावर भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “खेर यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत अद्याप स्पष्टता नाही, त्यामुळे यावर प्रतिक्रिया देता येणार नाही. मात्र, निवडणूक जवळ आलेली असताना अशा घटनांमुळे पक्षाची प्रतीमा मलीन होते”, असे हा नेता म्हणाला. खेर या आपल्या मतदारसंघात नसतात, यावरूनही त्यांच्यावर याआधी टीका झालेली आहे.
खेर अनेकवेळा वादाच्या केंद्रस्थानी
किरण खेर पहिल्यांदाच वादात सापडल्या आहेत असे नाही. याआधी त्यांनी बलात्कार झालेल्या एका महिलेविषयी वादग्रस्त विधान केले होते, यामुळे त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. रिक्षात अगोदरच तीन पुरुष बसलेले असताना ही महिला रिक्षात कशाला बसली? असे खेर म्हणाल्या होत्या. वाद झाल्यानंतर खेर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. मी एका आईच्या भूमिकेतून बोलत होते, असे त्या म्हणाल्या होत्या. “रिक्षात अगोदरच तीन पुरुष बसलेले असल्यामुळे त्या महिलेने रिक्षात बसायला नको होते, असे मला म्हणायचे होते. एका मुलीचे रक्षण व्हावे, हाच उद्देश समोर ठेवून मी तसे म्हणाले,” असे स्पष्टीकरण खेर यांनी दिले होते.
खेर यांची मतदारांवरही टीका
या वर्षाच्या मार्च महिन्यात एका सभेला संबोधित करताना त्यांनी मतदारांना उद्देशून ‘लानत है’ अशा शब्दाचा वापर केला होता. त्या चंदिगडच्या किशनगड भागात एका प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना “चंदिगडमधील डीप कॉम्प्लेक्स भागात एकही मतदार मला मतदान करणार नसेल तर ही फार लाजीवराणी बाब आहे”, असे खेर म्हणाल्या होत्या.
खेर यांची नगरसेवकांवरही टीका
जून २०२२ मध्ये खेर यांनी आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांवर रानटी म्हणत टीका केली होती. “आम आदमी पार्टीचे नगरसेवक टेबल आणि काचांची तोडफोड करत होते. मी असा जंगलीपणा कधीही पाहिलेला नाही. हे नगसेवक जंगलात फिरत असल्यासारखे वाटत होते. हा भाग प्राण्यांनी ताब्यात घेतल्यासारखे वाटत होते”, असे खेर म्हणाल्या होत्या. या विधानानंतर आप पक्षाच्या नेत्यांनी खेर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.
काँग्रेस, आपच्या नेत्यांचा खेर यांच्यावर आरोप
चालू वर्षाच्या जून महिन्यात आम आदमी पार्टीचे नेते जसबीर यांनी खेर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. खेर यांनी माझ्याविषयी बोलताना असंसदीय शब्दांचा वापर केलेला आहे. असंसदीय शब्द वापरून त्यांनी मला धमकी दिली आहे, असे जसबीर म्हणाले होते. काँग्रेसचे नेते दामनप्रित सिंह यांनीदेखील खेर यांनी माझ्याविषयी बोलताना अपशब्दांचा वापर केला आहे, असा आरोप केला होता.