सुहास सरदेशमुख
शिवसेनेतील बंडाळीनंतर ढोलताशांचा गजर व्हावा असे काहीच घडत नव्हते. ‘गद्दार’ शब्दाचा यथेच्छ उपयोग करत पुन्हा संघटन बांधणीचे प्रयोग सुरू असतानाच विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी औरंगाबादच्या अंबादास दानवे यांची निवड झाली आणि शिवसैनिकांनी बुधवारी जल्लोष केला. संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, संदीपान भुमरे, प्रा. रमेश बोरनारे आणि अब्दुल सत्तार हे पाच आमदार शिवसेना सोडून गेले. त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विधान परिषद विरोधीपक्ष नेते पदी निवड झाल्यानंतर दानवे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि राज्य सरकारचे त्याकडे झालेले दुर्लक्ष याकडे लक्ष वेधण्याचे ठरविले असून अधिवेशनापूर्वी ते नांदेड, हिंगोली व विदर्भातील काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
हेही वाचा… महेश लांडगे यांना मंत्रीपदाची हुकलावणी
अंबादास दानवे हे शिवसेनेतील संघटक नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नाव. ठराविक कालावधीनंतर शिवसैनिकांना सतत कार्यक्रम देण्यात दानवे हे नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळेच गेल्या १३ वर्षापासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी मतभेद असतनाही सेनेतील तरुणांना वेगवेगळया माध्यमातून बांधून ठेवण्यात त्यांना यश आले. आरक्षण मागणीसाठी निघालेल्या मराठा मोर्चानंतर औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणाचे दोन पदर लक्षवेधक आहेत. त्यात धर्माच्या आधारावर होणारे मतविभाजन आणि त्यातील दुसरा भाग हा मराठा व मराठेतर वादाचा. या वादातही अंबादास दानवे यांची भूमिका लक्षवेधक होती. त्यामुळे शिवसेनेतील वाद अधून-मधून चव्हाट्यावर आले तरी सतत कार्यक्रम आणि संपर्कातून दानवे यांनी शिवसैनिकांना बांधून ठेवले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेच्या महापालिकेतील चुका सुधारण्याचे काम करत दानवे यांनी सेनेची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेनेतील नेत्यांमध्ये नाराजी असली तरी ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्ता बांधून ठेवणारा नेता अशी दानवे यांची ओळख आहे. कोविड काळात सर्वसामांन्यांना मदत करण्यासाठी ते पहिल्यांदा बाहेर पडले होते.
हेही वाचा… माधव सूत्र – अतुल सावेंना बळ देत ओबीसी नेतृत्वातून पंकजा मुंडे यांना वजा करण्याचा प्रयत्न
महापालिकेच्या राजकारणातून कारकीर्दीची सुरुवात करणारे अंबादास दानवे हे २००३ पर्यंत नगरसेवक होते. सभागृह नेता म्हणूनही त्यांनी काम केले. समाजशास्त्र, पत्रकारिता, विधि शाखेची पदवी मिळविणाऱ्या दानवे यांनी अनेक आंदोलने केली. ऊस, कापूस या पिकांना भाव मिळावा, जायकवाडीमध्ये हक्काचे पाणी मिळावे यासाठी त्यांनी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना घेराव घातला. सत्तेत असताना शिवसैनिकांमध्ये भाजप विरोधाची भावना सातत्याने रुजविण्यासाठीही त्यांनी कार्यक्रम दिले. कर्जमाफीच्या आंदोलनात भाजपला घेरण्याच्या भूमिका घेत शिवसेना वाढती ठेवण्यात त्यांची भूमिका नेहमी मध्यवर्ती राहिली. असे करताना शिवसेना नेत्यांना दुखावले तरी त्याची पर्वा न करण्याची वृत्ती त्यांनी कायम राखली. शीर्षस्थ नेत्यांना संघटन चालविण्यासाठी लागणारे कार्यक्रम देणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेतील फुटीमुळे निर्माण झालेल्या पोकळीत त्यांना आता विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली आहे.
मागास मराठवाड्यातील प्रश्नावर आवाज उठविण्यापासून ते शिवसेनेतील आपल्याच नेत्यांच्या विरोधात ते कशी आणि कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. भाई उद्धवराव पाटील, गाेपीनाथ मुंडे यांनी तर काही काळासाठी धनंजय मुंडे यांनीही विरोधी पक्ष नेते पद सांभाळले. दानवे हे चौथे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यामुळे दानवे यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्याकडून मराठवाड्याच्या आणि सर्वसामांन्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.