वसई– लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा पराभव तर झालाच परंतु बालेकिल्ला असलेल्या वसई, नालासोपारा आणि बोईसर या ३ मतदारसंघात पिछेहाट झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बविआला महाविकास आघाडीची आणि महायुतीच्या तगड्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी वसई, नालासोपारा आणि बोईसर या मतदारसंघात बविआचे वर्चस्व आहे. २००९ मध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे खासदार म्हणून निवडून आले होते. तर २०१९ च्या निवडणुकीत बविआला ४ लाख ९१ हजार मते मिळाली होती. गेल्या काही वर्षात बविआने पालघर जिल्ह्यात आपल्या पक्षाचा विस्तार केला होता. त्या जोरावर यंदा बविआने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना मैदानात उतरवले होते. जिल्ह्यातील विक्रमगड, डहाणू आणि पालघरमधून फार मतांची अपेक्षा नव्हती. परंतु वसई, नालासोपारा आणि बोईसर या मतदारसंघात प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी होऊ, अशी रणनिती पक्षाने आखली होती. त्यासाठी जोरदार प्रचार केला होता. मात्र बविआचे दावे फोल ठरले आणि त्यांचा दारूण पराभव झाला. महायुतीचे भाजप उमेदवार डॉ हेमंत सावरा यांनी ६ लाख १ हजार ४४ मते मिळवली आणि १ लाख ८३ हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. दुसर्या क्रमांकावर महाविकास आघाडीच्या भारती कामडी (४ लाख १७ हजार ९३८) ठरल्या तर बविआ ( २ लाख ५४ हजार ५१७) तिसर्या क्रमांकावर फेकला गेला.
हेही वाचा – प्रणिती शिंदे यांची विधानसभेसाठी कसोटी
या पराभवात बविआसाठी चिंतेची बाब ठरली ते बालेकिल्ला असलेल्या तीन मतदारसंघातील पिछेहाट. भाजपाच्या हेमंत सावरा यांनी वसईतून ९ हजार ४१९ नालासोपाऱ्यातून ५७ हजार ३५८ आणि बोईसरमधून ३९ हजार १४८ मताधिक्याची आघाडी घेतली. सावरा यांना ४३.३९ टक्के, महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांना ३०.३७ टक्के तर बविआच्या राजेश पाटील यांना केवळ १८.५० टक्के मते मिळाली.
तिरंगी लढतीचे आव्हान?
बविआने कुठल्याही धर्म आणि जातीचे राजकारण न करता विकासकामे हा केंद्रबिंदू ठेवला होता. त्यामुळे सर्व धर्मियांची पक्षाला साथ होती. भाजप-सेनेच्या जातीयवादी राजकारणामुळे मुस्लिम-दलित मते हा बविआकडे हक्काची मतपेढी होती. वसईतील ख्रिस्ती थेट बविआकडे नसले तरी कॉंग्रेसच्या माध्यमातून ते बविआला साथ देत होते. २०१९ च्या निवडणुकीत बविआसोबत असणारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) आणि माकप हे पक्ष यंदा महाविकास आघाडीसोबत होते. त्यामुळे बविआला २०२९ च्या निवडणुकीत ४ लाख ९१ हजार मते मिळाली होती. या लोकसभा निवडणुकीत नव्याने तयार झालेले महाविकास आघाडीचे समीकरण केवळ वसईत नव्हे तर राज्यात यशस्वी ठरले आहे. मुस्लिम, दलित आणि ख्रिस्ती मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार पणे लढण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे महायुतीने आधीपासून मतदारसंघ बांधून अप्रत्यक्ष प्रचाराला सुरवात केली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता असून बविआला ते आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बोईसर मतदारसंघात बविआच्या राजेश पाटील यांचा निसटता विजय झाला होता तर नालासोपारामध्ये क्षितीज ठाकूर यांना सर्व ताकद पणाला लावावी लागली होती. त्यामुळे येणार्या निवडणुकीत बविआला बालेकिल्ला राखणे फार सोपे नसणार आहे. मात्र बविआ विधानसभेच्या विजयाबाबत ठाम आहे.
हेही वाचा – सांगलीत जागावाटपावरून काँग्रेस, शरद पवार गटात आतापासानूच कुरघोड्या सुरू
लोकसभेची गणितं विधानसभेला बदलतात असा आजवरचा इतिहास आहे. लोकसभेसाठी भाजपाला मतदान करणारे मतदार विधानसभा आणि महापालिकेसाठी बहुजनला मते देत असतात. त्यामुळे येत्या विधानसभेत आम्हाला विक्रमी मते मिळून विजयी होऊ असा बविआचा दावा आहे. विजय झाला नसला तरी आम्ही आमचे मतदार आम्ही कायम ठेवले आहेत. त्यामुळे आम्हाला तिरंगी लढतीचे आव्हान अजिबात नसल्याचे पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा प्रयोग आता झाला आहे. पण आमच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र येत असतात. महाविकास आघाडीसोबत गेलो तरी स्थानिक नेते साथ देत नाहीत. तिन्ही मतदारसंघात आमची स्वत:ची मते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीचा फरक पडत नसल्याचे बहुजन विकास आघाडीचे नेते सांगतात. अर्थात बविआ गाफिल नाही आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन आतापासून त्यांनी डावपेच आखण्यास सुरवात केली आहे.