रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने उद्याोगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे राजापूरमधून नशीब अजमावीत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्याशी त्यांची लढत असली तरी भावाच्या विजयासाठी उदय सामंत यांची सारी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेले २० हजारांचे मताधिक्य हे किरण सामंत यांच्यासाठी लढत सोपी नाही हेच स्पष्ट होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या वेळी प्रथमच मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे. राजापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात किरण सामंत यांनी आव्हान उभे केले आहे. पण काँग्रेसमधील बंडखोरीमुळे शिवसेनेचे राजन साळवी यांचे नुकसानच होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आमदार राजन साळवी तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे हे विजयी झाले तरी उदय सामंत यांच्या रत्नागिरी तसेच राजापूरमधून शिवसेना ठाकरे गटाला आघाडी मिळाली होती. हा सामंत बंधूंसाठी धोक्याचा इशारा आहे. स्वत:चा रत्नागिरी मतदारसंघ राखण्याबरोबरच राजापूरमध्ये भावाच्या विजयासाठी उदय सामंत यांना सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे.

हेही वाचा >>>Red Book : ‘संविधान बदलणार’ या मविआच्या नरेटिव्हला भाजपाचं प्रत्युत्तर; विधानसभेला ‘लाल पुस्तका’ची चर्चा का होतेय?

राजन साळवी यांनी २०१४ पासून या मतदारसंघावर आजतागायत एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र नाराज झालेल्या काँग्रेसचे अविनाश लाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली आहे.

निर्णायक मुद्दे

● राजन साळवी तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गेल्या पाच वर्षांत आमदार साळवी यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडून चौकशी लावून त्यांना घेरण्याचे प्रयत्न केले गेले होते. मात्र साळवी डगमगले नाहीत. ते नेटाने चौकशीला सामोरे गेले होते.

● बारसूचा नियोजित तेलशुद्धीकरण प्रकल्प हा तालुक्यातील वादाचा मुद्दा आहे. शिवसेनेने (ठाकरे) गटाने या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. जनभावना लक्षात घेऊन शिवसेनेचे (शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांनीही प्रकल्प लादला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge for kiran samant from rajapur assembly election constituency print politics news amy