वर्धा : वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची झालेली नियुक्ती पक्षातील छुप्या विरोधकांना अधिक धक्कादायी ठरण्याची चिन्हे आहेत. यावेळी प्रथमच जिल्ह्यात चारही आमदार भाजपचे निवडून आलेत. त्यांचे नेतृत्व आता डॉ. भोयर यांच्याकडे आपसूक आले आहे. प्रथम मंत्रिपद, सोबतीस भरजरी खाती व आता पालकमंत्रीपद असे भोयर यांचे बसलेले लागोपाठ धक्के पक्षातील समतुल्य समजल्या जाणाऱ्या नेत्यांना बसले आहे. ‘काल परवाचा’ अशी यांची भोयरकडे पाहण्याची दृष्टी.
आर्वीचे सुमित वानखेडे, हिंगणघाटचे समीर कुणावार व देवळीचे राजेश बकाने या तीन आमदारांसोबतच माजी खासदार रामदास तडस यांचे वर्तुळ भोयरभोवती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून वानखेडे आब राखून आहेच. मंत्रिपद आपल्यालाच असा अविर्भाव कुणावार यांचा राहला. ते नं मिळाल्याच्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नसल्याचे भाजप पदाधिकारी सांगतात. बकाने हेच आमदार झालो, याचाच आनंद ठेवतात. वानखेडे मंत्री होण्याचे कारणच नसल्याचे सहज बोलल्या गेले. पण अश्या पक्षास शंभर टक्के यश लाभलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तेवढी सोपी बाब भोयर यांना निश्चित ठरणार नाही. बड्या नेत्यांचा इगो व पदामुळे निर्माण आव्हान या दोन्ही कसोट्यावर डॉ. भोयर यांना खरे उतरावे लागणार. आतापर्यंतच्या वाटचालीत त्यांनी दाखविलेले राजकीय चातुर्य केवळ पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही आश्चर्य देणारे ठरले आहे.
आणखी वाचा-धनंजय मुंडे यांना धक्का, पंकजा मुंडेंसमोर जालन्यात आव्हान
डॉ. भोयर यांना पालकमंत्री पदाचा दरारा परिचित असाच. कारण सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना त्यांचे सर्वात विश्वासू म्हणून आमदार डॉ. भोयर यांची पक्षात ओळख होती. खुद्द मूनगंटीवार यांनी अर्थमंत्री असतांना तिजोरीची एक चावी वर्ध्यात ठेवली असल्याचे जाहिर वक्तव्य केले होते. त्या काळात भोयर यांनी भरभरून विकास निधी वर्धा मतदारसंघात ओढला होता. कामे कशी करवून घ्यायची व निधी कसा आणायचा याचे प्रशिक्षणच त्या काळात त्याचे झाल्याचे म्हटल्या जाते. आता स्वतः हे पद ते सांभाळणार. पण पक्षात समतुल्य म्हटल्या जाणारे सहकारी आमदार असल्याने भोयर यांचे स्वातंत्र्य संकोचणार. असे हे राजकीय चित्र असतांनाच पक्षाचा सहकार व संघटनात्मक पैस वाढविण्याचे आव्हान आहेच.
आणखी वाचा-पुण्याचे भाजपचे नेतृत्व मुरलीधर मोहोळ यांच्याकडे
पालकमंत्री डॉ. भोयर यांचा स्वभाव हे त्यांचे अँसेट समजल्या जाते. नं दुखावता आपला मार्ग प्रशस्त करण्याचे चातुर्य त्यांनी दाखवून दिलेच आहे. त्यांच्यावर उघड नाराजी कोणी व्यक्त करीत नाही. विश्वासात घेऊन कामे करण्याची हातोटी त्यांनी दाखवून दिलीच. पण या पदामुळे इतरांच्या उंचावणाऱ्या अपेक्षांची पूर्ती करणे ही सोपी बाब नाही. निधीवाटप, योजना मंजुरी, कामांचे प्रस्ताव या परीक्षा घेणाऱ्या बाबी ठरू शकतात. उपक्रमवेडा पक्ष म्हटल्या जाणाऱ्या भाजपमध्ये पदाधिकारी जपणे आलेच. स्वतःच्या वर्धा मतदारसंघाची जबाबदारी व इतर तीन मतदारसंघाची अपेक्षा ही कात्री आहेच. पालकमंत्री हे पद काय याची अलीकडे झालेली मोठी चर्चा लोकांच्या स्मरणात आहेच. म्हणून अपेक्षापूर्तीचे मोठे ओझे सांभाळून डॉ. भोयर यांना पुढील काळात वाटचाल करावी लागणार.