अमरावती जिल्‍ह्यात महायुतीसमोर बंडखोरीचे आव्‍हान

बंडखोरी टाळण्‍यासाठी भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्‍यांना दम दिला असला, तरी अनेक‍ ठिकाणी संघर्ष अटळ मानला जात आहे.

Challenge of Rebellion for Mahayuti in Amravati
महायुतीसमोर बंडखोरांना रोखण्‍याचे आव्‍हान असणार आहे. (प्रतिकात्मक छायाचित्र)

लोकसत्‍ता विशेष प्रतिनिधी

अमरावती : भाजपच्‍या उमेदवारांच्‍या पहिल्‍या यादीत धामणगावचे आमदार प्रताप अडसड आणि अचलपुरातून प्रवीण तायडे यांचे नाव झळकताच त्‍यांच्‍या समर्थकांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण असतानाच जिल्‍ह्यातील इतर मतदारसंघांमधील इच्‍छुकांची अस्‍वस्‍थता वाढली आहे. महायुतीसमोर बंडखोरांना रोखण्‍याचे आव्‍हान असणार आहे.

बंडखोरी टाळण्‍यासाठी भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्‍यांना दम दिला असला, तरी अनेक‍ ठिकाणी संघर्ष अटळ मानला जात आहे. बडनेरा मतदारसंघ भाजपसाठी सर्वात अडचणीचा बनला आहे. या ठिकाणी भाजपला पाठिंबा देणारे आमदार रवी राणा महायुतीच्‍या पाठिंब्‍याच्‍या प्रतीक्षेत आहेत. पण, भाजपचे इच्‍छूक उमेदवार तुषार भारतीय संघर्षाच्‍या पवित्र्यात आहेत. बडनेरा मतदारसंघ भाजपकडेच राहील, असा त्‍यांचा दावा आहे. रवी राणा हे गेल्‍यावेळी काँग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या प‍ाठिंब्‍यावर उभे होते. यावेळी भाजपचे समर्थन हवे आहे. भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांनी वर्षानुवर्षे सतरंज्‍या उचलण्‍याचेच काम करायचे का, असा सवाल करीत त्‍यांनी बंडाचा झेंडा उचावला आहे.

आणखी वाचा-पेणच्या उमेदवारीबाबत भाजपमध्ये संभ्रम

महायुतीत अमरावतीच्‍या जागेवर राष्‍ट्रवादीच्‍या अजित पवार गटाने दावा केला आहे. आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्‍यात आले आहे. त्‍यांना राष्‍ट्रवादीची उमेदवारी मिळेल, असे संकेत आहेत. पण, त्‍याचवेळी भाजपचे नेते आणि माजी पालकमंत्री जगदीश गुप्‍ता यांनीही निवडणूक लढण्‍याची सज्‍जता केल्‍याने बंडखोरीची शक्‍यता वर्तवली जात आहे.

महायुतीत दर्यापूरच्‍या जागेवरून तिढा आहे. दर्यापूरमधून शिवसेना शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ यांनी निवडणूक लढण्‍याची तयारी केली आहे. भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा यांनी दर्यापूरची जागा भाजप लढवेल, अशी घोषणा केली, त्‍यामुळे संघर्षांची स्थिती निर्माण झाली. या ठिकाणाहून माजी आमदार रमेश बुंदिले, सिद्धार्थ वानखडे, संजय आठवले आदी स्‍पर्धेत आहेत.

आणखी वाचा-सपाची हुकमी चाल! मविआच्या साथीने MIM व महायुतीला शह? पाच मतदारसंघात लोकसभेची पुनरावृत्ती होणार?

मोर्शी मतदारसंघावर राष्‍ट्रवादीच्‍या अजित पवार गटाने दावा केला आहे. आमदार देवेंद्र भुयार हे राष्‍ट्रवादीच्‍या उमेदवारीच्‍या प्रतीक्षेत आहेत. या ठिकाणाहून भाजपच्‍या अर्चना मुरूमकर यांच्‍यासह अनेक जण इच्‍छूक आहेत. तिवसामधून काँग्रेसच्‍या यशोमती ठाकूर यांच्‍या विरोधात भाजपतर्फे कुणाला उमेदवारी मिळेल, याची उत्‍सुकता आहे. शिवसेनेतून भाजपमध्‍ये प्रवेश करणारे राजेश वानखडे यांच्‍यासह निवेदिता चौधरी, रविराज देशमुख हे देखील उमेदवारीसाठी दावेदार आहेत.

मेळघाटची जागा देखील अडचणीची बनली आहे. प्रहारमधून बाहेर पडून शिंदे गटाची साथ देण्‍याचा निर्णय घेणारे आमदार राजकुमार पटेल हे महायुतीच्‍या उमेदवारीच्‍या प्रतीक्षेत आहेत. ही जागा कुणाला मिळणार, याची उत्‍सुकता आहे. भाजपने धामणगाव रेल्‍वेमधून प्रताप अडसड यांना तर अचलपूरमधून प्रवीण तायडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या समर्थकांमध्‍ये आनंदाचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Challenge of rebellion for mahayuti in amravati print politics news mrj

First published on: 20-10-2024 at 21:12 IST
Show comments