छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणात मदत केल्याचा दावा करणारे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आव्हान उभे केले आहे. २०६ कोटी रुपयांची संपत्ती असणाऱ्या आक्रमक तानाजी सावंत यांच्यासमोर सौम्य आणि मितभाषी राहुल मोटे हेच उमेदवार राहतील, हा निर्णय घेताना महाविकास आघाडीमध्ये बराच ताण निर्माण झाला होता. त्यामुळेच सावंत यांच्याबरोबर लढण्यासाठी राहुल मोटे यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची कशी साथ मिळवतात, यावर निवणुकीचा निकाल अवलंबून आहे.
परांडा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांना ८१ हजारांचे मताधिक्य होते. त्यामुळेच सावंत यांच्यासमोरील अडचणी वाढतील, असे सांगण्यात येत होते. धाराशिवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निंबाळकर निवडून यावेत यासाठी स्वत: शरद पवार यांनी बारकाईने लक्ष घातले होते. त्यामुळे निंबाळकर परांड्याच्या राजकारणात राहुल मोटे यांना मदत करतील, असा दावा केला जात आहे. निंबाळकर यांच्या भाषणाला गर्दी होते. त्यामुळे भूम-परांड्याच्या प्रचारात ते सांगतील ते मुद्दे अधिक चर्चेत येतील.
हेही वाचा >>>पत्रकार, भाजपाचे लक्ष्मण ते पंतप्रधानपदाचे दावेदार; कशी होती प्रमोद महाजनांची राजकीय कारकीर्द?
‘भैरवनाथ शुगर’च्या माध्यमातून परांडा तालुक्यातील शेतकरी मतदारांची सावंत यांनी बांधणी केली आहे. त्यांचे पुतणे धनंजय हे जिल्हा परिषदेच्या राजकारणात असल्याने त्यांचा संपर्कही मोठा आहे. पण सावंत यांची अडचण आहे ती वादग्रस्त वक्तव्यांची आणि कार्यशैलीची. राग आल्यावर आणि राजकीय पटलावर मनाप्रमाणे घटना घडल्या नाहीत, की सावंत चिडचिड करतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर धारेवर धरतात. त्यांच्या कार्यशैलीला कंटाळून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातून बदली करून घेतली. बोलण्यातील आक्रमकपणामुळे सावंत यांनी दुखावलेले कार्यकर्ते मितभाषी राहुल मोटे यांना मदत करतील, असा राष्ट्रवादीचा होरा आहे.
हेही वाचा >>>पूर्व नागपुरात राष्ट्रवादीसमोर अडचणींचा डोंगर
निर्णायक मुद्दे
● राहुल मोटे यांचा संपर्क दांडगा आहे. त्यांना शिवसेनेतील नेते कशी साथ देतात यावर परांड्यातील निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे.
● राजकीय अर्थाने बलाढ्य तानाजी सावंत यांच्या विरोधातील वातावरण आपल्या बाजूने वळविण्यासाठी या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ला ‘मशाल’ किती पुढे नेते यावर मतदारसंघाचे गणित ठरेल.
● शिवसेनेत धाराशिव जिल्ह्यातील सर्व निर्णय तानाजी सावंत हेच घेतात.सावंत यांच्या मतदारसंघातील संपर्कावर मात्र बऱ्याचदा प्रश्नचिन्ह लावले जात.