सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता असून दोन नगरसेवकांनी आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून अजित पवार यांच्या गटात असल्याचे जाहीर केले आहे. यातच महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतल्याने संशयकोळ निर्माण झाला असताना सोमवारी महापौरांच्या दालनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा लावण्यावरून वादंग पाहण्यास मिळाला. या संपूर्ण प्रकरणामध्ये महापौरांची कोंडी झाल्याचे दिसत असले तरी सध्याच्या महापालिकेची मुदतच आता एक महिन्याचीच उरली असल्याने फारशी खळखळ होणार नसली तरी जयंत पाटील यांना महापालिका क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व टिकवण्यासाठी बरीच यातायात करावी लागणार असे दिसत आहे.
महापालिकेतील सर्वाधिक सदस्य संख्या भाजपकडे असतानाही महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसला सोबत घेऊन आणि भाजपमध्ये फूट पाडून महापौरपद राष्ट्रवादीने हिसकावून घेतले. महापालिकेत राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. मात्र, काँग्रेसचे संख्याबळ त्यापेक्षा अधिक म्हणजे २० असताना महापौरपद राष्ट्रवादीला आणि उपमहापौरपद काँग्रेसला अशी सत्तेची वाटणी झाली. स्थायी सभापतीपदासाठी काँग्रेसला मदत करण्याचा शब्द राष्ट्रवादीने दिला. मात्र, अखेरपर्यंत स्थायीचे सभापतीपद काँग्रेसला मिळाले नाही. राष्ट्रंवादीच्या मागे काँग्रेसची फरपट झाली ती केवळ काँग्रेसअंतर्गत असलेल्या गटबाजीमुळेच असेही म्हणावे लागेल.
आतापर्यंत महापालिकेत जयंत पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा अशी गेल्या अडीच वर्षांत वाटचाल राहिली आहे. महापौरपद हे राष्ट्रवादीने दिग्विजय सुर्यवंशी यांना दिले असले तरी बहुतांशी कारभार सत्ताबाह्य केंद्रामार्फत चालविला जात असल्याचा आक्षेप काँग्रेसकडून होत आहे. यातून आमदार पाटील यांच्याबाबत असलेली नाराजी राष्ट्रवादीतील फुटीनंतर उघड होत असली तरी सद्यस्थितीला त्याला अद्याप मूस फुटलेली नाही, कारण सध्याची मुदतच एक महिन्यावर येऊन ठेपली असल्याने ज्यावेळी निवडणुकीचा मोसम सुरू होईल त्यावेळी पळापळ अपेक्षित आहे.
अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार तासांत अभिनंदनाचे फलक मिरजेत माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी लावले. यापूर्वीही महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली सत्ता काबीज केली होती. त्यावेळी महापौरपद नायकवडी यांच्याकडे होते. सत्तेच्या अखेरच्या टप्प्यात जयंत पाटील सत्तेवर असतानाही नायकवडी यांनी शह देत स्थायी सभापतीपद संजय मेंढे यांना मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. यामुळे आमदार पाटील यांना महापालिका क्षेत्रात आव्हान देण्याचे धाडस नायकवडी यांच्याकडे आहे असे मानले जात आहे.
हेही वाचा – पश्चिम विदर्भात पक्षाच्या पुनर्बांधणीचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न
भाजपसोबत सत्तेत जाण्यास पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. यामुळे अजित पवारांचे पहिले लक्ष्य पाटील हेच असणार आहेत. महापालिका क्षेत्रात नायकवडी गटाला ताकद देउन पाटील यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. महापौर दालनात उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यावरून सोमवारी वादंग माजले. सदस्य अतहर नायवकडी यांनी दिलेल्या प्रतिमेचा स्वीकार महापौरांनी केला. मात्र, दर्शनी ठिकाणी नायकवडी यांच्या कार्यकर्त्यांनी दालनात लावला. मात्र, नायकवडी दालनातून बाहेर गेल्यानंतर फोटो काढण्यात आला. तथापि, फोटोवरून राजकीय स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप महापौरांनी केला.
मुळात महापौर सुर्यवंशी यांचे आणि अजित पवार यांचे नातेसंबंध असल्याने या फोटो स्टंटबाजीला फारसे महत्व दिले जाणार नाही. तथापि, महापालिकेतील राष्ट्रवादीचे किमान सात सदस्य नायकवडी यांच्या संपर्कात असून हा चक्रव्यूह पाटील कसे भेदतात आणि आपले वर्चस्व कसे कायम राखतात हे पाहणेही रंजक ठरणार आहे.