सोलापूर : १९७०-८० च्या दशकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आलेले आणि खऱ्या अर्थाने सोलापुरात जडणघडण झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आता पक्षाच्या फाटाफुटीनंतर याच जिल्ह्यात किमान तालुका पातळीवरचा एकही वजनदार नेता उरला नाही. संपूर्ण जिल्ह्यात पर्यायी नेतृत्व स्वतः शरद पवार यांनाच तयार करावे लागणार आहे. किंबहुना हेच त्यांच्यासमोर आव्हान राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील तीन पिढ्यांच्या राजकारणात स्वतःचा प्रभाव दाखविणारे शरद पवार यांच्यावर सोलापूरकरांनी नेहमीच प्रेम केले आहे. ‘घार उडे आकाशी, तिचे चित्त पिल्लापाशी’ या उक्तीप्रमाणे सोलापूरशी पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, नामदेवराव जगताप, भाई एस. एम. पाटील, औदुंबर पाटील, सुधाकर परिचारक, वि. गु. शिवदारे, गंगाधर कुचन, बाबुराव चाकोते, ब्रह्मदेव माने, बाबूराव पाटील-अनगरकर, राजाराम ढवळे, आबासाहेब किल्लेदार यांच्यापासून ते या नेत्यांच्या तिसऱ्या पिढीतील रणजितसिंह मोहिते-पाटील, बाळराजे पाटील आदीपर्यंत तरुण नेत्यांना शरद पवार यांचे सानिध्य मिळत गेले आहे.

हेही वाचा – चिराग पासवान लवकरच भाजपाशी युती करणार? केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता

उजनी धरणातील पाणी बारामतीला वळविण्याचा किंवा कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प गुंडाळण्याचा विषय असो, सोलापूरकरांच्या हिताचे निर्णय कितीही सकारात्मक वा नकारात्मक असले तरीही शरद पवारांची जादू अनुभवास आली आहे. १९७२ साली दुष्काळाचे संकट ओढवले तेव्हा सोलापूरचे पालकमंत्री या नात्याने शरद पवार यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांना सोबत घेऊन काम केले होते. या अर्थाने पवार यांची राजकीय जडणघडण याच सोलापुरातून झाली. मला याच सोलापुरातून नेहमी ऊर्जा मिळते, असे जाहीरपणे सांगणारे शरद पवार यांनी १९८५ साली सोलापुरात महापालिका आणि जिल्हा परिषदेवर पुलोदच्या माध्यमातून सत्ता काबीज केली होती. याच सोलापूरचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे तर पवारांचे शिष्य आहेत. स्थानिक राजकारणात सोलापूर शहर सुशीलकुमार शिंदे यांनी तर जिल्हा ग्रामीण भाग विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांभाळावा. यात कोणीही एकमेकांत ढवळाढवळ करायची नाही, असा अलिखित करार स्वतः शरद पवार यांनीच करून दिला होता. त्यानुसार सुशीलकुमार व मोहिते-पाटील यांचे राजकारण चालत होते.

या पार्श्वभूमीवर १९९२ च्या सुमारास पवार आणि मोहिते-पाटील यांच्यात बिनसले आणि नंतर त्यांच्यात समझोता झाला आणि पुढे १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर मोहिते-पाटील यांनी विचारपूर्वक पवारांना साथ दिली. परंतु पुढे त्यांच्यात अधुनमधून शीतयुद्ध व्हायचे. दरम्यान, २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत स्वतः शरद पवार हेच माढा मतदारसंघातून निवडून आले आणि नंतर झालेल्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे पवार-मोहिते यांच्यात बेबनाव वाढला असतानाच तिकडे शरद पवार व अजित पवार यांनी मोहिते-पाटील यांना पर्याय म्हणून माढ्याचे बबनराव शिंदे, त्यांचे बंधू संजय शिंदे, करमाळ्याचे दिगंबर बागल, सांगोल्याचे दीपक साळुंखे, पंढरपूरचे सुधाकर परिचारक आदींना ताकद दिली. याच राजकारणाला वैतागून सुधाकर परिचारक यांनी थेट भाजपमध्ये जाणे पसंत केले. नंतर मोहिते-पाटील यांनाही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणे भाग पडले. त्यामुळे पवार आणि मोहिते-पाटील यांच्यात उघड संघर्ष वाढला असताना संपूर्ण जिल्ह्यात मोहिते-पाटील यांना भक्कम पर्यायी नेतृत्व निर्माण करण्यात पवार काका-पुतण्यास मर्यादा आल्या.

हेही वाचा – दोघांनीही आपले ‘उप’ पद वाचविले !

दिलीप सोपल, प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना मंत्रीपद दिले तरी ते आपापल्या भागापुरतेच मर्यादित राहिले. माढ्याचे आमदार बबनराव शिदे व त्यांचे बंधू आमदार संजय शिंदे हे दोघेही बडे साखर सम्राट झाले. ज्या त्या तालुक्यात संस्थानिक झालेले नेते पक्षापेक्षा स्वतः मोठे होत गेले तरी त्यातून मोहिते-पाटील यांच्या तोडीस तोड पर्यायी नेतृत्व निर्माण झाले नाही. एवढेच नव्हे तर यापैकी काही नेते आलिकडे मतलबी वारे पाहून राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. तर कोणी भाजप प्रवेशाचा मुहूर्त शोधत होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवार भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री होताच सोलापुरातील शिंदे बंधूंसह सर्व तीन आमदार आणि इतर सर्व माजी आमदार, पदाधिकारी अजित पवार यांच्याकडे गेले. त्यामुळे माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ, बार्शी, सांगोला आदी भागांत शरद पवार गटाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे.

मोहिते-पाटील यांनी पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला पहिला मोठा सुरुंग लावला होता. त्यानंतर आता शरद पवार यांच्याकडे किमान तालुका पातळीवरचासुद्धा नेता राहिला नाही. त्यामुळे जिल्ह्यात नवीन नेतृत्व उभे करताना शरद पवार यांची कसोटी लागणार आहे. सुदैवाने, इकडे सोलापूर शहरात पक्षाच्या बहुसंख्य मंडळींनी शरद पवार यांच्यावरील निष्ठा ढळू न देता कायम ठेवली आहे. हा त्यातल्या त्यात पवारांना दिलासा म्हणावा लागेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge to sharad pawar to form alternative leadership in solapur print politics news ssb