पुणे : केंद्रात आणि राज्यात गेल्या दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत चांगले यश मिळत असल्याने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या आता वाढत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुणे मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणारे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी झाले. त्यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने मोहोळ यांच्याबरोबर काम केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या इच्छा आकांक्षा उंचावल्या आहेत. मोहोळ यांना मिळालेले यश लक्षात घेऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आता थेट विधानसभेसाठी विद्यमान आमदारांच्या विरोधातच दंड थोपटले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघापैकी अपवादात्मक एखादा मतदार संघ वगळता इतर सर्वच मतदार संघात विधानसभेसाठी एकापेक्षा जास्त अधिक इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर पक्षात होणारी ही बंडखोरी थोपविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर असणार आहे.

आणखी वाचा-Udhayanidhi Stalin : ‘सनातन’ला डेंग्यू, मलेरिया म्हणणार्‍या उदयनिधींना उपमुख्यमंत्रीपद, द्रमुकची धुरा? स्टॅलिन यांनी उत्तराधिकारी नेमला?

आगामी विधानसभेमध्ये हे चित्र बदलण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली असून प्रत्येक लोकसभेतील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षातील नेत्यांकडे देण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांपैकी पर्वती, कसबा आणि कॅंटोन्मेंट या मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आली आहे. तर शिवाजीनगर, कोथरूड, वडगावशेरी, खडकवासला या मतदार संघाची जबाबदारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. या दोन्ही नेत्यांनी त्यांना दिलेल्या मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यमान आमदार यांच्याशी चर्चा करत संवाद साधला. तेथेही त्यांना पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेला सामोरे जावे लागले.

गेल्या पंधरा वर्षांपासून पर्वतीमधून आमदार म्हणून हॅटट्रिक करणाऱ्या माधुरी मिसाळ यांना या निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी श्रीनाथ भिमाले यांनीच आव्हान उभे केले आहे. महापालिकेत सभागृह नेते म्हणून काम केलेल्या भिमाले यांनी गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारलेल्या पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी कसब्यातून पुन्हा पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

आणखी वाचा-One Nation One Election: १९६७..इंदिरा गांधींची पहिली तर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची शेवटची निवडणूक; ५७ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

वडगावशेरी मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे असले तरी हा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडू नये, अशी भूमिका या भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भाजपचा नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीत या भागातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्यास आम्ही कामच करणार नाही असा थेट इशाराच दिला आहे. या मतदारसंघातून माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह माजी नगरसेवक अनिल टिंगरे आणि अन्य काही पदाधिकारी इच्छुक आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात बंडखोरी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाच भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आव्हान उभे केले आहे. बालवडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे कार्यक्रम आयोजित करून या मतदारसंघात धमाल उडून दिली आहे. वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला शब्द दिला असून त्यामुळेच सक्रिय झाल्याचे बालवडकर यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-Chirag Paswan : उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसला नवं आव्हान; चिराग पासवान यांनी आखली मोठी योजना

शिवाजीनगर मतदार संघातून निवडणूक लढविण्याची अनेकांनी तयारी सुरू केली आहे. विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना आव्हान देत माजी आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सनी निम्हण, दत्ता खाडे, यांच्यासह भाजपच्या समित्यांवर पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्यांचे भावी आमदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स या मतदारसंघात लावण्यात आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार शिरोळे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून आमदार मुलासाठी आता माजी खासदार अनिल शिरोळे हे देखील मैदानात उतरले आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांचा मागील निवडणुकीत अत्यंत कमी मताधिक्याने विजय झाला होता. या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी जोर लावला आहे. यामध्ये माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, हरिदास चरवड यांच्यासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश न केलेले माजी नगरसेवक विकास दांगट हे प्रयत्नशील आहेत.

हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर यांचे पक्षाने विधान परिषदेवर पुनर्वसन केले असले तरी विधानसभेसाठी हा मतदार संघ भाजपने घ्यावा अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. बहुतेक सर्वच मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्यास पक्षात होणारी बंडखोरी थांबविण्याची मोठी कसरत भाजपच्या शहर पातळीवरील नेत्यांसह राज्य पातळीवर नेत्यांना करावी लागणार हे निश्चित आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge to the bjp to stop the insurgency in pune print politics news mrj